राजेश टोपे यांनी घेतली ओबीसी उपोषणकर्त्यांची धावती भेट; ५ मिनिटांच्या भेटीनंतर म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2024 12:33 PM2024-06-22T12:33:04+5:302024-06-22T12:33:32+5:30
दहव्या दिवशी उपोषणस्थळी केवळ पाच मिनिटांची भेट, उपोषणकर्त्यांशी केवळ एकच मिनिट संवाद साधल्याने ओबीसी बांधव नाराज
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : ओबीसी नेते उपोषणार्थी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा दहावा दिवस आहे. दरम्यान, आज सकाळी घनसावंगी मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री राजेश टोपे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन विचारपूस केली. मात्र अवघ्या ५ मिनिटांची धावती भेट देऊन गेल्याने ओबीसी बांधवाकडून नाराजीचा सूर निघत आहे.
ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनात हाके यांनी राज्य सरकारकडे काही मागण्या केल्या आहेत. यावर शुक्रवारी सायंकाळी मुंबईत ओबीसी शिष्टमंडळ आणि राज्यसरकार यांच्यात बैठक झाली आहे. तसेच आज दुपारी राज्य सरकारचे शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांची भेट घेणार आहेत. दरम्यान, आज सकाळी माजी मंत्री राजेश टोपे यांनी उपोषणस्थळी धावती भेट दिली. त्यानंतर टोपे म्हणाले की, स्थानिक प्रतिनिधी म्हणून मी या ठिकाणी आलो आहे. महाराष्ट्र हा साधू संतांचा वारकरी संप्रदायाचा आणि समाज सुधारकांचा आहे. आरक्षणाचा प्रश्न सामंजस्याने सुटावा. कुठेही तेढ निर्माण होऊ नये, अशा भावना टोपे यांनी व्यक्त केल्या.
अशी कोणती धावपळ आहे..: नवनाथ वाघमारे
मी राजेश टोपे यांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे. त्यांना सर्व समाज सारखा असला पाहिजे. मनोज जरांगे यांच्याकडे एवढं तात्काळ जातात. आमच्याकडे दहाव्या दिवशी येत फक्त एक मिनिटं भेट घेतली. आमच्या मागण्या सुद्धा विचारल्या नाहीत. टोपे साहेबामागे अशी कोणती धावपळ आहे. आज का हे मंत्री आहेत का ? असा सवाल उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे यांनी टोपेंना केला.
शासनाकडून लेखी मिळालं नाही : लक्ष्मण हाके
शासनाकडून कोणत्याही मागणीवर लेखी मिळालं नाही. ओबीसीचा प्रश्न म्हटल्यावर आपल्याकडे प्राधान्य नाही का? असा सवाल लक्ष्मण हाके यांनी सरकारला केला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याशी बैठक झाली. येणाऱ्या अधिवेशनामध्ये चर्चा होईल असे उत्तर मिळालं. आम्ही येथेच बसायला तयार आहोत त्यांनीही बसाव. हे कायद्याचं राज्य आहे का ? हे सामाजिक न्यायाचे राज्य आहे का? बांठीया आयोगाचा रिपोर्ट मान्य नाही..बांठीया कमिटीचे रिपोर्ट हा सॅम्पल सर्वे आहे, त्यामुळे तो मान्य करायचा प्रश्न उरत नाही, असेही लक्ष्मण हाके म्हणाले आहे.