जिल्ह्याच्या विकासासाठी जे शक्य ते करणार -राजेश टोपे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 01:08 AM2020-01-14T01:08:28+5:302020-01-14T01:09:18+5:30

जे- जे शक्य होईल, ती विकास कामे आपण खेचून आणू, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी आयोजित सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळ्यात व्यक्त केला.

Rajesh Tope will do whatever is possible for the development of the district | जिल्ह्याच्या विकासासाठी जे शक्य ते करणार -राजेश टोपे

जिल्ह्याच्या विकासासाठी जे शक्य ते करणार -राजेश टोपे

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्याच्या विकासासाठी आपण यापूर्वीही पालकमंत्री असताना विविध विकास कामे केली. आता पुन्हा कॅबिनेट मंत्री म्हणून आरोग्य खात्याच्या रूपाने संधी मिळाली आहे. या संधीचे आपण निश्चितपणे सोने करू. राज्यावर पाच लाख कोटी रूपयांचे कर्ज आहे. त्यामुळे सर्वच अपेक्षा पूर्ण होतील, असे नाही. परंतु, अशाही स्थितीत जे- जे शक्य होईल, ती विकास कामे आपण खेचून आणू, असा विश्वास आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी आयोजित सर्वपक्षीय नागरी सत्कार सोहळ्यात व्यक्त केला.
जालना शहरातील टाऊन हॉल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सोमवारी राजेश टोपे यांच्या नागरी सत्काराचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे होते.
पुढे बोलताना टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यातील राजकीय नेत्यांमध्ये कधीच फारसे हवेदावे नसतात. विकासाच्या मुद्द्यावर पश्चिम महाराष्ट्राच्या धर्तीवर आपण एकत्रित आले पाहिजे, ही आमचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची इच्छा असते. त्यानुसारच आपण गेल्या मंत्रीपदाच्या काळातही काम केले आणि यावेळी करणार, असे ते म्हणाले. जास्तीत जास्त विकास कामे कसे होतील, यासाठी आपण कटिबध्द राहणार असून, रक्ताचे पाणी आणि हाडाचे काडे करून आपण जिल्हा आणि शहराचा विकास करू, असे आश्वासनही त्यांनी दिले. गेली पाच वर्षे आपण विरोधी पक्षात असताना देखील जनतेच्या विकास कामांना प्राधान्य दिले. वेगवेगळ्या मंत्र्यांकडे जाऊन जिल्ह्यासाठी निधी खेचून आणला. राजकारण म्हणजे एक प्रकारे समाजकारण असल्याचे आपण मानतो. समाजसेवेमध्ये अण्णा हजारे, मेधा पाटकर यांची जशी नावे आहेत तसे राजकारणातही अनेक चांगले नेते आपल्या जिल्ह्यात आहेत. सांघिक पध्दतीने राजकारण करण्यावर आपला नेहमीच विश्वास राहिला आहे. सर्वांना सोबत घेऊन जिल्ह्याचा विकास करणार आहोत, यासाठी आरोग्य खाते आपण स्वत:हून मागून घेतले असल्याचेही टोपे यांनी सांगितले. महाराष्ट्रावर साडेपाच कोटी रूपयांचे कर्ज असून, महसुली तूट मोठ्या प्रमाणावर आहे. वेतन आणि निवृत्ती वेतनावरही मोठा निधी खर्च होत असल्याने विकासासाठी पाहिले तेवढा निधी मिळत नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. समाजातील वेगवेगळ्या घटकातील अभ्यासू व्यक्तींनी त्यांना आवश्यक वाटणारे प्रस्ताव तयार करून माझ्याकडे द्यावेत, आपण त्यावर प्राधान्याने विचार करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
यावेळी आ. नारायण कुचे, मनसेचे जिल्हाध्यक्ष गजानन गिते, ज्येष्ठ नेते इकबाल पाशा, काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष राजेंद्र राख, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. निसार देशमुख यांनीही टोपे यांच्या एकूणच कार्याबद्दल गौरवोद्गार काढले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राजेंद्र राख यांनी तर सूत्रसंचालन संजय काळबांडे यांनी केले. कार्यक्रमास माजी आ. चंद्रकांत दानवे, अरविंद चव्हाण, माजी आ. सुरेशकुमार जेथलिया, जिल्हा काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष भीमराव डोंगरे, भाजपचे शहराध्यक्ष राजेश राऊत, बाळासाहेब वाकुळणीकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ए.जे.बोराडे, विश्वंभर भोसले, नंदकुमार जांगडे, विनित साहनी, बाजार समितीचे उपसभापती भास्कर दानवे, जि.प.चे अध्यक्ष उत्तम वानखेडे, उपाध्यक्ष महेंद्र पवार, बबलू चौधरी, परतूर बाजार समितीचे सभापती कपिल आकात, काँग्रेसचे शेख महेमूद, जयमंगल जाधव, रमेशचंद्र तौरावाला, संजय दाड, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्ष विमलताई आगलावे, जयंत भोसले, अशोक पांगारकर आदींची उपस्थिती होती.
कैलास गोरंट्याल यांच्याकडून रावसाहेब दानवेंवर स्तुतीसुमने
आ. कैलास गोरंट्याल यांनी विचार व्यक्त करताना त्यांच्या खास शैलीत शेरोशायरी करीत सर्वांचे लक्ष वेधले. आज तीन पक्षांचे सरकार असताना राजेश टोपे यांना मंत्री होण्याची संधी मिळाल्याचे समाधान आहे. आपली संधी हुकल्याचे दु:खही त्यांनी व्यक्त करताना आपण मंत्री नाही तर थेट मुख्यमंत्री होऊ, असा टोलाही त्यांनी लगावल्यावर सभागृहात हशा पिकला. गेल्या पाच वर्षात सर्वात जास्त निधी हा केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी आणल्याचे आवर्जून सांगून त्यांची स्तुती करताना ते विकासपुरूष असल्याचे नमूद केले. राजकारण करताना ओव्हरटेक करावेच लागते, असे सांगून त्यांनी अंबेकरांकडे बघून हा विशेष उल्लेख केला. जिल्ह्यात परिचारिका प्रशिक्षण महाविद्यालयातील जागा वाढविण्याची मागणी करून जेनेरिक हब, मनोरुग्णालय जालन्यात व्हावे, म्हणून घोषणा केली होती. त्यासाठी टोपे यांनी पाठपुरावा करण्याची गरज व्यक्त केली. - आ. कैलास गोरंट्याल, काँग्रेस
संघर्ष आणि परिश्रमामुळेच राजकारणात यशस्वी
गेल्या ३५ वर्षांपासून आपण राजकारणात सक्रिय आहोत. हे करत असताना लोकांमध्ये राहून त्यांचे प्रश्न, अडीअडचणी सोडविताना विकासाची कामे खेचून आणली. आयसीटी, ड्रायपोर्ट आदी विकास कामे आणली आहेत. रस्ते विकासाचे मोठे जाळे आपल्या सरकारच्या काळात विणले गेले आहे. एकूणच राजकारण आणि समाजकारण करत असताना तुमच्याकडे सर्वांचे लक्ष असते. तुमचे व्यवहार, तुमचे वागणे, तुम्ही दिलेली आश्वासने हे मुद्देही महत्त्वाचे ठरतात. संधी मिळाल्यानंतर ती टिकविणे ही एक जबाबदारी असते. राजकारण करताना आमच्या अंतर्मनात कुठली दु:खे असतात हे आम्हालाच माहीत, असे सांगून राजा आणि फकिराची गोष्टही दानवे यांनी त्यांच्या खास शैलीत सांगून सभागृहात हशा पिकविला. स्व. अंकुशराव टोपे आणि त्यांचे पुत्र राजेश टोपे यांची शिस्त आणि संस्था चालविण्यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट हे महत्त्वाचे ठरतात. ते सतत पाच वेळेस निवडून आले म्हणजे, त्यांना किती कष्ट घ्यावे लागले असतील हे आपण जाणून आहोत. राजकारण, चित्रपट आणि त्यानंतर क्रिकेटचा खेळ आपल्याकडे लोकप्रिय आहे. - रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री

Web Title: Rajesh Tope will do whatever is possible for the development of the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.