मत विभाजन झालेच नाही; टोपेंचा ओव्हर कॉन्फिडन्स नडला, उढाणांनी घेतला २०१९ चा बदला
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 06:32 PM2024-11-26T18:32:51+5:302024-11-26T18:33:38+5:30
राजेश टोपेंच्या बालेकिल्ल्यात हिकमत उढाण यांनी मारली मुसंडी, अटीतटीचा लढतीत २,३०९ मतांनी विजय
तीर्थपुरी : घनसावंगी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार राजेश टोपे यांना मतविभागणी झाल्याचा फायदा होईल, असा ओव्हर कॉन्फिडन्स अखेर पराभवाकडे घेऊन गेला. या मतदारसंघात टोपे यांचे प्रतिस्पर्धी असलेले महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उढाण यांनी २०१९ च्या निवडणुकीतील अटीतटीचा बदला घेत २,३०९ मतांनी विजय मिळवला आहे.
घनसावंगी विधानसभा मतदारसंघात एकूण २३ उमेदवार आखाड्यात होते. यात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उढाण व महाविकास आघाडीचे शरद पवार गटाचे विद्यमान आमदार माजी मंत्री राजेश टोपे, भाजपाचे बंडखोर उमेदवार सतीश घाडगे, शिवसेनेचे बंडखोर उमेदवार शिवाजी चौथे, वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार कावेरी खटके हे प्रमुख उमेदवार होते. या मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हिकमत उढाण व अपक्ष उमेदवार सतीश घाडगे यांच्यातच खरी लढत झाली. तिसऱ्या क्रमांकावर वंचित बहुजन आघाडीच्या कावेरी खटके यांनी मते घेतली. यंदाची निवडणूक टोपे यांनी सहज घेतल्याने मतदारांनी हात दाखवल्याची चर्चा
घनसावंगी विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार माजी मंत्री राजेश टोपे यांनी पाचवेळा विधानसभेचे प्रतिनिधित्व केले आहे. एवढेच नव्हे तर उद्धव ठाकरे सरकारमध्ये त्यांनी आरोग्य मंत्री पदही सांभाळले होते. परंतु, यावेळी त्यांनी ही निवडणूक सहज घेतली होती. त्यामुळे त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले असल्याचे बोलले जात आहे. अपक्ष उमेदवार सतीश घाडगे, शिवाजी चौथे वंचितच्या उमेदवार कावेरी खटके हे उमेदवार महायुतीच्या मताचे विभाजन करणारे असल्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी टोपे यांना सांगत होते. त्यामुळे या निवडणुकीत नियोजनबद्ध प्रचार केला नसल्याचे दिसून आले आहे. तसेच राजेश टोपे यांच्याकडून व्यापारी व विविध समाजनिहाय बैठका घेण्यात आल्या नाहीत. त्याचाही निवडणूक निकालावर परिणाम झाल्याचे दिसून आले आहे.
या मतदारसंघात महायुतीचे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार हिकमत उढाण यांचा २०१९ च्या निवडणुकीत पराभव झाला होता. त्यामुळे ही उणीव भरून काढण्यासाठी त्यांनी आपले सर्वस्व पणाला लावले होते. त्यामुळे उढाण यांनी २०१९ च्या निवडणुकीचा बदला घेत राजेश टोपे यांचा पराभव केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात चांगलीच रंगली होती. या मतदारसंघात सतीश घाडगे यांनी देखील चांगली मते घेतल्याचे दिसून आले आहे. मतदारसंघातील भोगगाव येथील एका केंद्राची मशीन बंद पडल्यामुळे निवडणूक आयोगाने तो निकाल जाहीर केला नसल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे.
विजयाची तीन कारणे
१ घनसावंगी विधानसभा मतदारसंघात साखर कारखानदारीचा उद्योग, प्रचारात मित्र पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला.
२ संपूर्ण मतदारसंघात नियोजनबद्ध प्रचार करण्यात आला होता. यावेळी सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून ते पदाधिकाऱ्यांपर्यंत सर्वांचा प्रचार यंत्रणेत सहभाग होता.
३ महायुती सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. त्याचाही परिणाम झाला आहे.
टोपेंच्या पराभवाची कारणे...
टोपे यांनी मंत्रिपदाच्या काळात तालुक्यातील अनेक रस्त्यांकडे दुर्लक्ष केले होते. गावागावांत कार्यकर्त्यांचे गट तयार झाले. प्रचारासाठी नियोजन केले नाही. सतीश घाडगेंमुळे मताची विभागणी होईल हा कॉन्फिडन्स भोवला. मित्र पक्षांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग दिसला नाही.
उमेदवाराचे नाव पक्ष मिळालेली मते
हिकमत बळीराम उढाण शिवसेना (शिंदे गट) ९८४९६
दिनकर बाबुराव जायभाये बहुजन समाज पार्टी ८७४
राजेशभैया अंकुशराव टोपे नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी
शरदचंद्र पवार ९६१८७
कावेरी बळीराम खटके वंचित बहुजन आघाडी २०७३१
बाबासाहेब संतुकराव शेळके समता पार्टी ४८३०
रमेश मारोतराव वाघ राष्ट्रीय समाज पक्ष २१७
विलास महादेव वाघमारे ऑल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅक १०९
श्याम कचरू साळवे बहुजन भारत पार्टी ५५४
आप्पा आण्णा झाकणे अपक्ष १८३
गजानन रामनाथ उगले अपक्ष १४२
सतीश गणपतराव उढाण अपक्ष २८८
सतीश जगन्नाथराव घाटगे अपक्ष २३६९६
शिवाजी कुंडलिकराव चाेथे अपक्ष २३२४
दिनकर उघडे अपक्ष १७८५
निसार पटेल अपक्ष ६५४
ज्ञानेश्वर प्रतापराव पवार अपक्ष ८२८
बाबासाहेब पाटील शिंदे अपक्ष १०९०
ॲड. भास्कर बन्सी मगरे अपक्ष २५९
राजेंद्र बबनराव कुरणकर अपक्ष १०८८
रामदास आश्रुबा ताैर अपक्ष १०४२
विलास आसाराम कोल्हे अपक्ष १४४
श्रीहरी यादवराव जगताप अपक्ष १५१
सतीश मधुकर घाडगे अपक्ष १३१