गोदी येथे रविवारपासून रामानंद स्वामी पुण्यतिथी उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:57 AM2021-02-05T07:57:18+5:302021-02-05T07:57:18+5:30

अशोक डोरले लोकमत न्यूज नेटवर्क अंबड : तालुक्यातील गोंदी येथे श्री रामानंद स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. ७, ते १० ...

Ramanand Swami Punyatithi celebrations from Sunday at the dock | गोदी येथे रविवारपासून रामानंद स्वामी पुण्यतिथी उत्सव

गोदी येथे रविवारपासून रामानंद स्वामी पुण्यतिथी उत्सव

Next

अशोक डोरले

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबड : तालुक्यातील गोंदी येथे श्री रामानंद स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त दि. ७, ते १० फेब्रुवारीदरम्यान लळित उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव सोहळ्यात दोन दिवस पालखी मिरवणूक असते, पालखीसमोर भजनी मंडळ, तसेच वाद्याच्या तालावर टिपरी खेळणे रंगते. शिवाय मुख्य उत्सवाचा कार्यक्रम द्वादशीला असतो. विविध प्रकारची सोंगे कलाकार सादर करतात. या उत्सवाला साधारण दोनशे वर्षांची परंपरा आहे.

रामानंद स्वामी हे सतराव्या शतकातील संत. त्यांनी संपादण्या हा काव्य प्रकार लिहिला. समाजाला आध्यात्मिक मार्गाला लावण्यासाठी रामानंद स्वामींनी आध्यात्मिक विचार मांडण्यासाठी या लोककलाकारांचा उपयोग केला आहे. प्रसाद व माधुर्य हे या संपादण्याचे वैशिष्ट्य आहे. ग्रामीण संस्कृतीचे यथार्थ चित्रण संपादण्यामध्ये रेखाटले आहे. त्या आध्यात्मिक व आव्हानात्मक असून मराठी, हिंदी भाषेत आहेत. या संपादण्यावर आधारित लळित उत्सव द्वादशीला साजरा होतो.

रामानंद स्वामी यांचा जन्म मध्यमवर्गीय ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांच्या जन्माविषयी निश्चित तारीख उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांच्या चरित्राविषयी निश्चित सांगता येत नाही. रामानंद स्वामी यांचे शिष्य अच्युताश्रम स्वामी यांनी लिहिलेल्या पोवाडा वरून रामानंद स्वामी यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकता येतो. उत्तर दिशेला मंगला नदीच्या पूर्व तीरावर प्राचीन लंक्याचाच् वाडा आहे, त्याठिकाणी रामानंद स्वामींची समाधी आजही आहे.

रामानंद स्वामींनी आपल्या संपादण्यातून तत्कालीन समाजजीवनाचे वास्तव चित्र रेखाटले आहे. तत्कालीन समाजजीवनामध्ये दिसून येणारे हरिदास, वासुदेव, वैदू, बैरागी, गोंधळी, जंगम, हरिदास, मारवाडी, वाघ्या-मुरळी, आराधी, फकीर, भराडी अदी लोककलाकार व त्यांचे जीवन या संपादण्यामधून पाहायला मिळते.

या लोककलाकारांनी मनोरंजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन केले. हाच धागा पकडून रामानंद स्वामी यांनी याच लोकांच्या प्रतिमांचा वापर करून समाजजागृतीचे कार्य संपादण्याच्या माध्यमातून केले.

लोकरूढींचे दर्शन घडवणारा लळित उत्सव दरवर्षी येथे रामानंद स्वामी यांच्या संपादण्यावर आधारित, अच्युताश्रम यांच्या संपादण्यावर आधारित कार्यक्रम सादर होत असतो. यामध्ये ३२ लोककलांचे दर्शन घडवले जाते. ही सोंगे सुरू असताना एका बाजूला सोंगाच्या अनुरूप दर्शन दाखवले जाते. त्याला झाकी असे म्हणतात. ही सोंगे सूर्योदयापर्यंत चालतात.

.....

चौकट-

कोरोनाच्या सावटाखाली यंदाचा उत्सव

यंदा कोरोनाच्या वैश्विक संकटामुळे हा उत्सव सावटाखाली साजरा होणार आहे. सर्व उत्सवादरम्यान मास्क, सॅनिटाझर व सुरक्षित अंतर ठेवून सर्व कार्यक्रम होतील, असे मठाधिपती यांनी सांगितले.

...............

कोट

मी स्वतः पंचवीस वर्षांपासून भराडी हे सोंग वंशपरंपरेने करीत आलो आहे. उत्सवानिमित्ताने दरवर्षी गावकरी एकत्र येतात. या कार्यक्रमामुळे नवीन उत्साह मिळतो. गावाची ही परंपरा अविरतपणे चालू आहे, याचा अभिमान आम्हाला वाटतो.

-डॉ. अभय गोंदीकर

................

फोटो

लळित उत्सवात सादर झालेले संग्रहित गणपतीचे सोंग.

रामानंद स्वामींची समाधी

Web Title: Ramanand Swami Punyatithi celebrations from Sunday at the dock

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.