उद्धव ठाकरेच आगामी मुख्यमंत्री : रामदास कदम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2018 01:06 AM2018-06-29T01:06:59+5:302018-06-29T05:59:51+5:30
महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेचे बोट धरून प्रवेश केला. आणि आता आमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. हे जनता विसरणार नाही. आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा दावा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुरूवारी येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात केला.
जालना : महाराष्ट्रात भाजपने शिवसेनेचे बोट धरून प्रवेश केला. आणि आता आमच्याच पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले आहे. हे जनता विसरणार नाही. आगामी निवडणुकीत त्यांना धडा शिकवून शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील असा दावा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी गुरूवारी येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात केला.
मराठवाड्यातील पाच जिल्ह्यातील शिवसैनिकांच्या मेळाव्याचे आयोजन बीज शीतल सीडस्च्या सभागृहात करण्यात आले होते. याचे उद्घाटन कदम यांच्या हस्ते करण्यात आले. या मेळाव्यात शिवसैनिकांना प्रभावी भाषण कसे करावे याचे प्रशिक्षण देण्यात आले. पुढे बोलताना कदम म्हणाले की, शिवसेनेचा जन्मच संघर्षासाठी झालेला आहे. शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या हितासाठी शिवसेना काढली. त्यांनी तळागाळातील सामान्य माणसाला नेतृत्वाची संधी देऊन मोठे केले. त्यातील मी देखील एक असल्याचे ते म्हणाले. जास्त भाषणबाजीपेक्षा शिवसेनेने नेहमीच जनतेच्या हिताच्या मागण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलनाला महत्त्व दिले.
राज्यात भाजप, शिवसेनेची युती टीकली ती प्रमोद महाजन आणि गोपीनाथराव मुंडे यांच्यामुळेच. आज स्थिती बदलली आहे. ज्या मतदार संघात निवडून येणे शक्य आहे, तेच मतदारसंघ भाजपाने त्यावेळी गोड बोलून शिवसेनेकडून घेतले आणि आम्हीही त्यांची मागणी पूर्ण करत गेलो. निवडणुकीतही त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचे काम केले नाही, उलट भाजपचा उमेदवार असला तरी शिवसैनिकांनी झोकून देऊन त्यांना विजयी केले.
गेल्या विधानसभा निवडणुकीच्यावेळी आम्ही गाफिल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सांगण्यावरून युती तोडली. असे असतानाही आम्ही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली ६३ जागा जिंकल्या. आता तर आम्ही स्वबळावरच विधासभेवर भगवा फडकवून उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करणार असल्याचे ते म्हणाले. मोदी सरकारच्या नोटबंदी, गरिबांच्या खात्यात १५ लाख रूपये जमा करण्याच्या निर्णयाचा रामदास कदम यांनी त्यांच्या खास शैलीत समाचार घेतला. प्लास्टिक बंदीचे समर्थन करतानाच आता गुटखाबंदीही करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. प्लास्टिक बंदीच्या मुद्यावरून नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्यावर हल्ला करताना त्यांचे डोके ठिकाणावर नसल्याचे सांगितले. मराठवाडा विद्यापीठ नामांतराच्या वेळी आज जो नामविस्तार झाला आहे, तो शिवसेना प्रमुखांनीच सुचविला होता, मात्र त्याचे श्रेय दुसऱ्यांनीच लाटल्याचे सांगून त्यांनी शरद पवारांचे नाव न घेता टीका केली. प्रास्ताविक जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनी केले. यावेळी परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथील जिल्हा प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा संपर्क नेते विनोद घोसाळकर, प्रा. नितीन बानगुडे, जि. प. अध्यक्ष अनिरूद्ध खोतकर, जिल्हा प्रमुख ए.जे. बोराडे, माजी आ. शिवाजी चोथे, संतोष सांबरे, भाऊसाहेब घुगे, विद्याथी सेनेचे जगन्नाथ काकडे, विष्णू पाचफुले, बाला परदेशी, भरत कुसंदल, यांच्यासह शिवसेना कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
राममंदिराच्या विटातून भाजपने कार्यालय बांधले
राम मंदिराचा मुद्दा आला की समजून घ्यायचे, निवडणुका आल्या आहेत. भाजपने राम मंदिर उभारणीसाठी देशातून एक, एक वीट जमा केली. कोकणातूनही अनेक रामभक्तांनी विटांची पूजा करून दिली. मात्र या विटातून भाजपने चिपळूण येथील भाजपचे कार्यालय बांधल्याचा आरोप पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी केला.