पगारवाढीसाठी मंदिरातील कर्मचारी संपावर, जांब समर्थ येथे रामदास स्वामींची विधिवत पूजा बंद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2023 01:08 PM2023-10-04T13:08:43+5:302023-10-04T13:10:05+5:30
ग्रामस्थ आणि भाविकांत संताप; विश्वस्थ मंडळ बरखास्त करण्यात केली प्रशासनाकडे मागणी
कुंभार पिंपळगाव (जि. जालना) : पगारवाढीच्या मागणीसाठी श्री क्षेत्र जांब समर्थ (ता. घनसावंगी) येथील मंदिर ट्रस्टचे कर्मचारी सोमवारपासून संपावर गेले आहेत. कर्मचारीच संपावर गेल्याने मंदिरातील विधीवत पूजाअर्चा बंद पडल्या असून, या प्रकारामुळे संतप्त भाविक, ग्रामस्थांनी ट्रस्टवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी तहसीलदार, पोलिस प्रशासनाकडे धाव घेऊन निवेदन दिले आहे.
पर्यटन विकास ब दर्जा असलेल्या श्री क्षेत्र जांब समर्थ हे रामदास स्वामी यांचे जन्मगाव म्हणून ओळखले जाते. सन १९३१मध्ये स्वामींच्या मंदिराचे बांधकाम झाले असून, त्या पूर्वीपासून रामदास स्वामींच्या मंदिरात विधीवत स्वामींची पूजा केली जाते. परंतु, २ ऑक्टोबर सोमवारी समर्थ रामदास स्वामी ट्रस्टचे कर्मचारी हे पगारवाढीच्या मागणीसाठी ट्रस्टला पूर्वकल्पना देऊन संपावर गेले आहेत. परिणामी सोमवारी सकाळपासून संत रामदास स्वामी यांच्या मंदिरात विधीवत पूजा झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांसह भविकांतून संताप व्यक्त होत आहे.
समर्थ मंदिर व राम मंदिर जांब समर्थ येथे राज्यासह देश - विदेशातून भाविक दर्शनासाठी येतात. येथील सहा ते सात कर्मचाऱ्यांचा पगार मंदिर ट्रस्टच्या माध्यमातून दिला जातो. परंतु, तुटपुंजा पगारातून घर चालत नसल्याने कर्मचाऱ्यांनी पगारवाढीची मागणी करीत संप करण्याचा इशारा दिला होता. २९ सप्टेंबर रोजी ट्रस्टला याबाबत कर्मचाऱ्यांनी सूचित केले होते. परंतु, मागणी मान्य न झाल्याने कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. या प्रकारामुळे भाविक, ग्रामस्थ संतप्त झाले असून, कारवाईच्या मागणीसाठी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले आहे. दरम्यान, उपविभागीय पोलीस अधिकारी बुधवंत यीन मंगळवारी परिसराला भेट देऊन पाहणी केली . पोलीस निरीक्षक प्रदीप त्रिभुवन यांनी सायंकाळी भेट देऊन ग्रामस्थ, ट्रस्टी यांच्यात समन्वय साधण्याचा प्रयत्न केला.
पूजा सुरु करण्याची मागणी
ट्रस्टी आणि मंदिर कर्मचाऱ्यांतील वादामुळे समर्थांची विधिवत पूजा बंद आहे, ती पूजा सुरु कारवाई, अशी एकमुखी मागणी ग्रामस्थांसह भाविकांमधून करण्यात आली आहे.
विश्वस्थ मंडळ बरखास्त करावे
संदर्भित ट्रस्टमधील अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव हे जांबसमर्थ येथे राहत नाहीत. ते जालना, छत्रपती संभाजीनगर येथून कारभार पाहत आहेत. त्यामुळे स्थानिक अडचणींकडे त्यांचे दुर्लक्ष होत असून, संदर्भित विश्वस्थ मंडळ बरखास्त करावे. शासनाने ताबा घेऊन पुढील व्यवस्था करावी.
- बाळासाहेब तांगडे, सरपंच