रमेश कदमने आरोप फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2019 12:31 AM2019-08-08T00:31:26+5:302019-08-08T00:32:19+5:30
अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये जवळपास ३१२ कोटी रूपयांच्या घोटाळ्यात अटक असलेल्या रमेश कदमला बुधवारी जालन्यातील न्यायालयात हजर केले होेते. त्याने पुन्हा एकदा आरोप फेटाळले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्यातील लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळामध्ये जवळपास ३१२ कोटी रूपयांच्या घोटाळ्यात अटक असलेल्या रमेश कदमला बुधवारी जालन्यातील न्यायालयात हजर केले होेते. यावेळी त्याने पुन्हा एकदा आरोप फेटाळले आहेत.
जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या न्यायालयातरमेश कदमला हजर केले होते. विशेष म्हणजे, यावेळी कदम याने नेहमीप्रमाणे आपल्याला आरोप मान्य नाहीत, अशी बाजू मांडली. हे प्रकरण चालविण्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील अॅड. प्रवीण चव्हाण यांची नेमणूक केली आहे. त्यांनी या घोटाळ्याची व्याप्ती न्यायालयासमोर विषद केली. तसेच या प्रकरणी दररोज सुनावणी व्हावी, अशी विनंती न्यायाधीशांना केली. यावर आता पुढील तारखेला सुनावणी होईल.
...अन् पोलीस अधीक्षकांनी आरोपींना हजर केले
अण्णा भाऊ साठे महामंडळातील संशयित आरोपी रमेश कदम याला बुधवारी न्यायाधीश वेदपाठक यांच्या न्यायालयात हजर केले गेले. परंतु, याच प्रकरणातील सहा आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले नव्हते. ही बाब विशेष सरकारी वकील चव्हाण यांनी न्यायालयाच्या लक्षात आणून दिली.
तातडीने चक्रे फिरवून पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी स्वतंत्र पथक नेमून जालन्यातील जिल्हा कारागृहातून संबंधित प्रकरणातील सहाही आरोपींना तात्काळ न्यायालयात हजर केले. या पोलीस अधीक्षकांच्या तातडीने घेतलेल्या निर्णयाबद्दल न्यायालयाने देखील त्यांचे कौतुक केले. सुनावणीला यापुढे गती येईल, असे अॅड. चव्हाण म्हणाले.