रणरागिणी सरसावल्या : रोहिलागडमध्ये बाटली आडवी करण्यासाठी झाले मतदान, गावातील दारूचे दुकान होणार बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 06:38 PM2017-10-26T18:38:46+5:302017-10-26T18:40:01+5:30
अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी गुरुवारी गावात मतदान घेण्यात आले. गावातील एक हजार ४६४ पैकी ८४२ महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मतदान केले.
रोहिलागड ( जालना ) : अंबड तालुक्यातील रोहिलागड येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यात यावे यासाठी गुरुवारी गावात मतदान घेण्यात आले. गावातील एक हजार ४६४ पैकी ८४२ महिलांनी देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी मतदान केले. त्यामुळे गावातील हे दुकान बंद करण्यात येणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली.
रोहिलागड येथे पंधरा आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत दारू बंदी करण्याचा ठराव घेण्यात आला होता. तसेच या पूर्वी महिलांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून दारूबंदीची मागणी केली होती. मात्र, दारूबंदी न झाल्यामुळे महिलांनी आक्रमक पवित्रा घेतला होता. गावातील देशी दारूचे दुकान बंद करण्यासाठी कायदेशीर मतदान घेण्याची मागणी ग्रामस्थांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे केली होती. त्यामुळे गुरुवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक भाग्यश्री जाधव यांच्या उपस्थिती गावात ग्रामसभा घेण्यात आली. या सभेला गावातील सुमारे दीड हजारांवर महिला उपस्थित होत्या.
दारू बंदीच्या ठरावासाठी झालेल्या मतदानात ८४२ महिलांनी दारूचे दुकान बंद करावे यासाठी मतदान केले. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी सरपंच आश्विनी वैद्य, ग्रामपंचायत सदस्य बद्री टकले, लताबाई टकले, सुरेश पाटील, किशोर टकले, प्रल्हाद वैद्य, राम दुधाटकर यांच्या उपस्थित ग्रामस्थांना एकत्र बोलावून दारूचे दुकान बंद न करण्यास कुणाचा आक्षेप आहे का याबाबत विचारणा केली. मात्र, सर्व महिलांनी गावातील दारूचे दुकान बंद व्हायलाच पाहिजे , असा पवित्रा घेतला. त्यामुळे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिका-यांनी आवश्यक नोंदी घेऊन येथील देशी दारूचे दुकान बंद करण्यात येईल, असे जाहीर केले.
राज्यउत्पादन शुल्क विभागाच्या जिल्हा अधीक्षक भाग्यश्री जाधव, निरीक्षक एस.आर. फटागडे, जे. एम. खिल्लारे, दुय्यम निरीक्षक आर.डी. गायकवाड, वि. के. चाळणेवार, विस्तार अधिकारी बी. जी. गुंजाळ, गटविकास अधिकारी यु. एन. जाधव यांनी ही कार्यवाही पूर्ण केली. यासाठी बाप्पासाहेब टकले, हनुमान तार्डे, नारायण टकले, हनुमान तार्डे, राहुल गुंजाळ, विजय टकले, सुखदेव पाटील, कल्याण टकले, राम पाटील, लक्ष्मण टकले, रंजित जाधव, तुळजीराम पांढरे, पिराजी ढोले, गंगाधर पाटील यांनी सहकार्य केले.