बांधकाम, आरोग्याच्या निधीवरून सभेत रणकंदन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:40 AM2021-06-16T04:40:13+5:302021-06-16T04:40:13+5:30
सभेच्या प्रारंभी भाजपाचे गटनेते गणेश फुके यांनी १८ कोटींचा मुद्दा मांडून जाब विचारला. राहुल लोणीकर यांनी परतूर तालुक्यातील श्रीष्टी ...
सभेच्या प्रारंभी भाजपाचे गटनेते गणेश फुके यांनी १८ कोटींचा मुद्दा मांडून जाब विचारला.
राहुल लोणीकर यांनी परतूर तालुक्यातील श्रीष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात एका लाभार्थ्याला कोविड लसीचे दोन वेगवेगळे डोस दिल्याबद्दल याची जबाबदारी निश्चित करून जि. प. प्रशासनाने केवळ शिक्षकांवर अन्यायकारक कारवाई केल्याचा मुद्दा उपस्थित केला. भाजपा सदस्य शालीकराम म्हस्के यांनी आरोग्य विभागाशी संबंधित असलेल्या दोन मुद्दयांवर अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला होता. ते म्हणाले, पालकमंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा नियोजन समितीतून कर्करोगावर निदान करण्यासाठी जि.प.ला ३० लाख रुपयांचा निधी दिला. कर्करोगाचे निदान कसे करायचे आणि कोणत्या तज्ज्ञांच्या माध्यमातून करायचे हा आरोग्य विभागाचा प्रश्न असला तरी कोणतीही निविदा न मागवता किंवा कोणतीही बँक हमी न घेता माजलगाव (जि. बीड) येथील एका सेवाभावी संस्थेला दहा लाख रुपयांचे देयक वित्त विभागाने अदा कसे केले? असा सवाल उपस्थित करून जे देयक अदा करण्यात आले आहे त्यातून कर्करोगाच्या निदानावर खर्च केलेल्या किमान १० हजार रुपयांचा हिशेब तरी संबंधित संस्थेने दिला का, असा प्रतिप्रश्न उपस्थित केल्याने मोठा गोंधळ उडाला होता.
शिवसेना सदस्य कैलास चव्हाण यांनी मग्रारोहयोअंतर्गत शेतकऱ्यांसाठी अकरा कलमी कार्यक्रम राज्य शासनातर्फे राबविण्यात येत असल्याचा मुद्दा उपस्थित करत या कार्यक्रमाअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात किमान ५६२ सिंचन विहिरी मंजूर करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र, अधिकाऱ्यांच्या उदासीन धोरणामुळे जिल्ह्यातील हजारो शेतकरी या योजनेपासून वंचित राहिले असल्याचे सांगितले. यावर अधिकाऱ्यांना उत्तर देता आले नाही.