Raosaheb Danve: ST संपातील कर्मचाऱ्यांना 1 महिन्याचा किराणा, भाजपकडून 'एक हात मदतीचा'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 01:16 PM2022-04-12T13:16:34+5:302022-04-12T13:20:07+5:30
पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर ॲड. सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली
मुंबई - राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या बंगल्यावर संपात सहभागी असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी हल्ला केला होता. याप्रकरणी 109 कर्मचाऱ्यांसह कामगारांचे वकिल अॅड. गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांनी अटक केली आहे. त्यामुळे, अद्यापही एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच असल्याचे दिसून येते. या संपातील कर्मचाऱ्यांना 22 एप्रिलपर्यंत कामावर रूजू होण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. दरम्यान, आज भाजपने संपातील कामगारांना 'एक हात मदतीचा' देऊ केला आहे.
पवार यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी गिरगाव न्यायालयात जोरदार युक्तिवाद झाल्यानंतर ॲड. सदावर्तेंच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने दोन दिवसांची वाढ केली. तर, कामगारांना अगोदरच न्यायालयीन कोठडीत पाठविण्यात आले आहे. एसटीतील बहुतांशी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरूच आहे. या संपातील कर्मचाऱ्यांना भाजपने एक हात मदतीचा दिला आहे. केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांच्याहस्ते या कर्मचाऱ्यांना 1 महिना पुरेल एवढ्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात आले आहे.
'एक हात मदतीचा'
माझ्या मतदारसंघातील भोकरदन, जाफ्रबाद व सिल्लोड डेपोतील संपावर असलेल्या एस टी कर्मचारी बंधु-भगिनींना एका महिन्याचे किराणा वाटप आज केले. आमदार संतोष दानवे यांच्या 'मदत नव्हे कर्तव्य' या संकल्पनेतून आयोजित कार्यक्रमास एस टी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, अशी माहिती रावसाहेब दानवेंनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन दिली.
काय म्हणाले परिवहनमंत्री अनिल परब
न्यायालयाने २२ एप्रिलपर्यंत कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचे निर्देश दिले होते. कोविड आणि संप दोन्ही संपले आहेत. आता एसटी सेवा पूर्ववत सुरू करण्यासाठी मंत्री अनिल परब यांनी सोमवारी मंत्रालयात अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर परब म्हणाले की, कोविडमुळे आधीच एसटीची चाके थांबली होती. त्यात कामगारांच्या संपामुळे राज्यभरात एसटी पूर्णपणे बंद झाली. मात्र, सर्वसामान्यांची एसटी लवकरच पूर्ववत होईल. संपकरी कामगार कामावर हजर झाल्यानंतर एसटी लोकांच्या सेवेला जाण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येतील, असे अनिल परब यांनी सांगितले. तसेच गेल्या दोन वर्षांमध्ये एसटीचे मार्ग विस्कळीत झाले असल्याने काही मार्गही ठरवावे लागणार आहेत, असे परब म्हणाले.