रावसाहेब दानवेंच्या गावात रेल्वे इंजिन येणार; अधिकाऱ्यांनी तीन ठिकाणची केली पाहणी
By महेश गायकवाड | Published: June 8, 2023 04:02 PM2023-06-08T16:02:28+5:302023-06-08T16:10:32+5:30
रेल्वेचा विस्तार झाला असून, अनेक ठिकाणी रेल्वे विजेवर धावत आहे. त्यामुळे डिझेल इंजिनवर धावणाऱ्या रेल्वे बंद झाल्या आहेत.
भोकरदन : शहराच्या सौंदर्यात लवकरच रेल्वेचे इंजिन भर घालणार आहे. शहर शुशोभीकरणाच्या दृष्टीने केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी रेल्वे विभागाकडे कार्यरत नसलेल्या रेल्वे इंजिनची मागणी केली आहे. हे रेल्वे इंजिन बसविण्यासाठी रेल्वे विभागाच्या नांदेड डिव्हिजनच्या अधिकाऱ्यांनी ७ जून रोजी शहरात तीन ठिकाणी जागेची पाहणी केली आहे.
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्याकडे रेल्वे राज्यमंत्री पद आहे. त्यांनी रेल्वे विभागाला भोकरदन व जालना शहरात रेल्वे इंजिन बसविण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या. त्या अनुषंगाने अधिकाऱ्यांनी ७ जून रोजी आमदार संतोष दानवे यांची भेट घेऊन तीन स्थळांची पाहणी केली. यावेळी नांदेड रेल्वेचे सिनिअर डिव्हिजन ऑफिसर जितेंद्र कुमार, सिनिअर सेक्शन इंजिनिअर प्रदीप व्यवहारे, गटविकास अधिकारी गजानन सुरडकर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष वाघमारे यांची उपस्थिती होती.
रेल्वेबद्दल आपुलकी निर्माण वाढेल
रेल्वेचा विस्तार झाला असून, अनेक ठिकाणी रेल्वे विजेवर धावत आहे. त्यामुळे डिझेल इंजिनवर धावणाऱ्या रेल्वे बंद झाल्या आहेत. हे डिजेल इंजिन विविध शहरांतील सुशोभीकरणासाठी व पर्यटन स्थळाच्या ठिकाणी बसविण्यात येत आहे. रेल्वेबद्दल आपुलकी निर्माण होण्याबरोबरच शहराच्या सुशोभीकरणात यामुळे भर पडणार आहे. भोकरदन शहरात बसिवण्यात येणाऱ्या रेल्वे इंजिनची लांबी ११.२५ मीटर, रुंदी २.५ मीटर व उंची ३.५ मीटर असणार आहे. या रेल्वे इंजिनचे वजन ३७ टन असणार आहे.
- जितेंद्र कुमार, सिनिअर डिव्हिजन ऑफिसर
शहर सुशोभीकरणाला मदत
केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या विशेष प्रयत्नातून जालना येथे दोन इंजिन आणण्यात येणार आहे. यामुळे शहर सुशोभीकरणाला मदत होईल. भोकरदन व जालना या दोन ठिकाणी १ ते २ महिन्यांत हे इंजिन बसविण्यात येणार आहे.
- संतोष दानवे, आमदार