रावसाहेब दानवेंची रणनीती यशस्वी; रामेश्वर कारखान्यासाठी विरोधकांनी अर्जच दाखल केले नाहीत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2023 07:21 PM2023-06-19T19:21:01+5:302023-06-19T19:24:08+5:30
यावेळच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काही जुन्या संचालकांना बाजूला करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे.
- फकिरा देशमुख
भोकरदन : तालुक्यातील रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी २१ जागांसाठी केवळ २३ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या निवडणुकीत विरोधकांनी उमेदवारी अर्जच दाखल केले नाहीत. त्यामुळे केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या गटाचे वर्चस्व सिद्ध झाले आहे.
रामेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सोमवारी दुपारी ३ वाजेपर्यंत ऊस उत्पादक गट व राखीव मतदारसंघातील २१ जागांसाठी २३ जणांचे अर्ज आले. यात केवळ टेंभुर्णी ऊस उत्पादक गटातील ३ जागेसाठी ५ उमेदवारांनी अर्ज दाखल केल्याने निवडणुक बिनविरोध होऊ शकली नाही. या निवडणुकीत आमदार संतोष दानवेसह १८ उमेदवारांचेच अर्ज दाखल आहेत. यामुळे यांची निवड बिनविरोध जाहीर करण्याची केवळ औपचारिकता बाकी राहिली आहे.
यावेळच्या निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी काही जुन्या संचालकांना बाजूला करून नवीन चेहऱ्यांना संधी दिली आहे. दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची २० जून रोजी छाननी होणार आहे. २१ जुलैपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत देण्यात आली. या निवडणुकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून डॉ. दयानंद जगताप, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा सहायक निबंधक संजय भोईटे, बी. आर. गिरी, डी. डी. बावस्कर, बी. टी. काकडे, एस. टी. रोठगे हे काम पाहत आहेत.
यांचे एकमेव अर्ज दाखल:
- राजूर गटात गणेश फुके, विजय वराडे, कमलाकर साबळे,
- भोकरदन गटातून दादाराव राऊत, प्रकाश गिरणारे, मधुकर तांबडे
- पिंपळगाव रेणुकाई गटातून भगवान सोनुने, पंडित नरवडे, अशोक लोखंडे,
- जाफराबाद गटातून सुरेश परिहार, आत्माराम चव्हाण, महादू दुनगहू,
- टेंभुर्णी गटातून जगन बनकर, माधवराव गायकवाड, कौतिकराव वरगणे, जगन वरगणे, श्रीराम गाडेकर,
- सहकारी संस्था मतदारसंघातून आमदार संतोष दानवे,
- अनुसूचित जाती-जमाती मतदार संघातून रामराव हिरेकर,
- महिला मतदारसंघातून शोभा मतकर, तान्हाबाई भागीले,
- इतर मागासवर्गीय मतदार संघातून विलासराव आडगावकर,
- विमुक्त जाती-जमाती मागास प्रवर्गातून सुरेश दिवटे