केंद्रीय मंत्री दानवेंकडून नगरसेवकांची झाडाझडती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2019 01:13 AM2019-07-16T01:13:10+5:302019-07-16T01:13:46+5:30

केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवेनी भाजपच्या नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले

Raosaheb Danve fires BJP Corporators | केंद्रीय मंत्री दानवेंकडून नगरसेवकांची झाडाझडती

केंद्रीय मंत्री दानवेंकडून नगरसेवकांची झाडाझडती

Next



संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालन्याचे राजकारण म्हटले की मिलीजुली सरकार, असा सर्वत्र समज पसरला आहे. आणि तो काही अंशी खरा देखील आहे. येथे कोणताच राजकारणी कोणाचे उणे-दुणे काढत नाही. जियो और जीने दो या तत्त्वानुसार जालन्याच्या राजकारणाची दिशा असल्याने अनेक महत्वाच्या मुद्यावर ना विरोधक सडकून टीका करत ना सत्ताधारी विरोधकांची लक्तरे वेशीवर टांगत. त्यामुळे शहरातील कोट्यवधी रूपये खर्च होऊन सुरू असलेल्या कामांच्या दर्जावर त्याचा परिणाम सर्वसामान्यांना दिसतो. परंतु आपला मुद्दा उचलणारे नेतृत्व नसल्याने चलता है.. म्हणून त्याकडे दुर्लक्ष केले जाते.
परंतु दोन दिवसांपूर्वी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे एक ते दीड तास जालन्यात आले होते. त्यांना दिल्लीला जायचे असल्याने त्यांनी त्यांच्या येथील निवासस्थानी भाजपच्या सर्व नगरसेवकांना बोलावून घेतले. त्यावेळी त्यांनी जवळपास सर्व नगरसेवकांची चांगलीच खरडपट्टी काढल्याचे सूत्रांनी सांगितले. एकूणच गेल्या चार ते पाच वर्षात आपण विविध योजनेतून शहरासाठी कोट्यवधींचा विकास निधी खेचून आणला. परंतु काही नगरसेवकांनी हा निधी खर्च करतांना काँग्रेसच्या स्थानिक नेत्याशी जुळवून घेतल्याची चर्चा आहे.
तसेच त्यांना हवे तसे प्रस्ताव तयार करून घेऊन निधी मिळवून घेतल्याचे आपल्या लक्षात आल्याचे दानवेंनी सांगत आपण गोट्या खेळत नसल्याचे सांगितले.
एकूणच या दानवेंच्या रौद्र रूपाने नगरसेवकांना घाम न फुटल्यास नवल. पालिकेतील विविध मुद्यांवरून सध्या प्रश्न गाजत आहेत. या कडे लक्ष देण्यासह हे सर्व मुद्दे तयार करून घेऊन नगरविकास विभागाच्या सचिवांकडे ते द्यावेत जर त्यात काही गौडबंगाल असेल त्याची चौकशी आपण लावू, अशी स्पष्ट भूूमिकाही त्यांनी घेतली. विशेष म्हणजे जालन्याची नगर पालिका ही काँग्रेसच्या ताब्यात असल्याने युतीचे नेते अर्थात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे तसेच राज्यमंत्री अर्जुन खोतकर हे दक्ष आहेत.
खोतकर यांनी जालना पालिकेचे विशेष लेखा परीक्षण करण्याच्या सूचना यापूर्वीच दिल्या आहेत. आता विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्याने सर्वच नेते आपले अस्तित्व पणाला लावत असल्याचे दिसून येते. आपल्या अल्पशा विश्राम काळात केंद्रीय मंत्री जाम चिडल्याने नगरसेवकांमध्ये चर्चेला उधाण आले होते.
विशेष म्हणजे, यावेळी भाजपच्या जिल्हाध्यक्षांनाही दानवेंनी चांगलेच धारेवर धरल्याची चर्चा भाजपमध्येच दबक्या आवाजात चर्चिली जात आहे.

Web Title: Raosaheb Danve fires BJP Corporators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.