रावसाहेब दानवे यांच्याकडे कार नाही, डोक्यावर ७ कोटींचे कर्ज; ९ कोटींवर संपत्ती वाढली
By विजय मुंडे | Published: April 24, 2024 03:52 PM2024-04-24T15:52:40+5:302024-04-24T16:19:51+5:30
रावसाहेब दानवे यांच्याकडे एकूण २८ कोटी ८८ लाखांची संपत्ती; शेती, खासदार पदाचे मानधन अन् भाडे हे उत्पन्नाचे स्रोत
जालना : जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपचे अर्थात महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्याकडे २८ कोटी ८८ लाख ४८ हजार ६४० रुपयांची तर त्यांच्या पत्नी निर्मला दानवे यांच्याकडे १३ कोटी ७१ लाख ८२ हजार रुपयांची संपत्ती असल्याचे लोकसभा निवडणुकीसाठी भरलेल्या शपथपत्रात नमूद केले आहे. शेती, खासदार पदाचे उत्पन्न, भाडे हे उत्पन्नाचे स्रोत आहेत.
रावसाहेब दानवे यांच्याकडे ४ कोटी ५१ लाख ३२ हजार ६१.७४ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. तर २४ कोटी ३७ लाख १६ हजार ५७९ रुपये स्थावर मालमत्ता आहे. निर्मला दानवे यांच्याकडे ८८ लाख ४४ हजार ६.४१ रुपये जंगम तर १२ कोटी ८३ लाख ३८ हजार ५ रुपये स्थावर मालमत्ता आहे.
उमेदवार- रावसाहेब दादाराव दानवे
वय- ६९
शिक्षण- बी.ए. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक.
अभ्यास केंद्र : मोरेश्वर कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, भोकरदन
गुन्हा- ०१
शिक्षा- निरंक
नऊ कोटींनी वाढ
२०१९ च्या तुलनेत रावसाहेब दानवे यांची संपत्ती ९ कोटी ७८ लाख ५७ हजार २१२.३७ रुपयांनी वाढली आहे. तर निर्मला दानवे यांची संपत्ती ९ कोटी ८६ लाख १५ हजार ४४७.६७ रुपयांनी वाढली आहे.
कर्जाचा डोंगर ७ काेटींवर
२०१९ मध्ये रावसाहेब दानवे यांच्याकडे एक रुपयांचेही कर्ज नव्हते. परंतु, २०२४ च्या शपथपत्रानुसार ४ कोटी २ लाख ४४ हजार ८१ रुपयांचे कर्ज आहे. तर निर्मला दानवे यांच्याकडे २०१९ मध्ये असलेले २४ लाख रुपयांचे कर्ज २०२४ मध्ये ३ कोटी ४६ लाख ३३ हजार २३७ रुपयांवर गेले आहे. दानवे दाम्पत्याकडे एकूण कर्ज ७ कोटी ४८ लाख ७७ हजार ३१८ रुपयांवर गेल्याचे शपथपत्रात नमूद आहे.
सोने-चांदी आहे तेवढेच
२०१९ च्या शपथपत्रानुसार रावसाहेब दानवे यांच्याकडे ४ किलो ७०० ग्रॅम चांदी व ५ तोळे सोने होते. तर निर्मला दानवे यांच्याकडे ४५ तोळे सोने व २ किलो ७०० ग्रॅम चांदी होती. तर २०२४ च्या शपथपत्रात सोने-चांदीच्या दागिन्यांमध्ये किंचितही वाढ दिसून येत नाही.
दानवेंकडे कारच नाही
२०१९ च्या शपथपत्रात एक कार असल्याचे रावसाहेब दानवे यांनी नमूद केले होते. परंतु, २०२४ च्या शपथपत्रानुसार रावसाहेब दानवे यांच्या नावे एकही कार दिसून येत नाही.