रावसाहेब दानवेंनी कार्यकर्त्याला मारली लाथ; विरोधकांच्या टीकेनंतर 'तो' कार्यकर्ता म्हणाला...
By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2024 12:41 PM2024-11-12T12:41:06+5:302024-11-12T12:44:20+5:30
विरोधकांनी दानवे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील दानवे यांच्या वागण्यावर भाष्य करत ट्रोलिंग केली.
जालना: आपल्या गावठी शैलीत मिश्किल टोलेबाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेले माजी केंद्रीय राज्यमंत्री भाजप नेते रावसाहेब दानवे एका नव्या वादात अडकले आहेत. दानवे आपल्या कार्यकर्त्याला लाथ मारत असतानाचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. आता ज्याच्यासोबत हा प्रकार झाला तो कार्यकर्ता समोर आला असून त्याने नेमके काय घडले हे सांगत निवडणुकीच्या काळात विरोधकांना असेच निमित्त लागते, असे म्हटले आहे.
जालना लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यापासून शिंदेसेनेचे अर्जुन खोतकर आणि रावसाहेब दानवे यांच्यात वितुष्ट आले होते. विधानसभा निवडणुकीत खोतकर जालनामधून महायुतीचे उमेदवार आहेत. मात्र, दानवे अद्याप त्यांच्या प्रचारात दिराकले नव्हते. यामुळे सोमवारी सकाळीच खोतकर बंधू भोकरदन येथे दानवे यांच्या निवासस्थानी गेले. येथे बंद दाराआड दानवे- खोतकर यांच्यात तब्बल दोन तास चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकांसोबत संवाद साधताना आता झाले गेले विसरून, आम्ही पुढे जाऊ, असे सांगत दिलजमाईवर शिक्कामोर्तब केले. यावेळी खोतकर यांनी दानवे यांना पुष्पगुच्छ दिला. मात्र, फोटो काढत असताना दानवे यांनी आपल्या बाजूला असलेल्या एका कार्यकर्त्यास लाथ मारून दूर लोटले. याचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामुळे विरोधकांनी दानवे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. तसेच नेटकऱ्यांनी देखील दानवे यांच्या वागण्यावर भाष्य करत ट्रोलिंग केली. यानंतर आता तो कार्यकर्ता समोर आला आहे.
काय म्हणाला तो कार्यकर्ता
रावसाहेब दानवे यांनी लाथ मारलेल्या त्या कार्यकर्त्याचे नाव शेख हमद असे आहे. ते म्हणाले की, माझा आणि रावसाहेब दानवे यांचा ३० वर्षांचा दोस्ताना आहे. दानवे यांचे शर्ट अडकल्याने त्यांच्या कानात मी सांगितले. मात्र, त्यांना ते समजले नाही, तसेच त्यावेळी त्यांच्या हातात पुष्पगुच्छ असल्याने दानवे यांनी मिश्किलपणे आपल्याला बाजूला सारले. निवडणुकीच्या काळात विरोधकांना असेच निमित्त लागते, असेही शेख हमद यांनी म्हटले आहे.
शरद पवार, संजय राऊत, सुषमा अंधारे यांची टीका
यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील टीका केली आहे. त्या पक्षामध्ये सहकाऱ्यांना कसे वागवले जाते याचे लक्षण असल्याचे पवार म्हणाले. तसेच संजय राऊत यांनी देखील दानवे यांच्यावर कितीवेळा बोलायचे असा सवाल केला. यावर देवेंद्र फडणवीस यांना विचारा, तुमच्या पक्षात कार्यकऱ्यांना असे वागवले जाते का, अशा शब्दांत समाचार घेतला. तसेच रावसाहेब दानवे यांचा व्हिडीओ ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी एका सभेत दाखवला. सुषमा अंधारे म्हणाल्या की, अशा पद्धतीने हे जर लोकांना लाथा घालत असतील तर जनता यांना लाथाडल्याशिवाय राहणार नाही. माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देण्याची चळवळ म्हणजे बाबासाहेबांची चळवळ आहे. महापुरुषांनी आम्हाला मानवतेचा वसा दिलाय. असे व्हिडीओ पाहिल्यानंतर वाटतं की, भाजपने तयार केलेले हे लोक अशा पद्धतीने वागवतात. २० तारखेला मतदानाला जाताना हा व्हिडीओ लक्षात ठेवा, असे त्यांनी म्हटले.