...अन् केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हाती घेतली कुऱ्हाड
By विजय मुंडे | Published: May 21, 2023 08:02 PM2023-05-21T20:02:08+5:302023-05-21T20:02:34+5:30
श्रमदान : घाणेवाडी जलाशयाच्या भिंतीवरील झाडेझुडपे तोडली.
विजय मुंडे
जालना : नवीन रेल्वे, नवीन रेल्वे मार्गांसह विविध विकास कामांचे उद्घाटन करणाऱ्या केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हाती कुऱ्हाड घेवून घाणेवाडी (ता.जालना) येथील संत गाडगेबाबा जलाशयाच्या भिंतीवरील काटेरी झुडपे तोडली. या प्रकल्पाची भिंत स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागातून सुरू असलेल्या श्रमदान मोहिमेत रविवारी दानवे यांनी सहभाग नोंदवून श्रमदान करीत सामाजिक संघटनांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन दिले.
नवीन जालना शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या घाणेवाडी येथील संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयाच्या भिंतीवरील वाढलेले गवत, काटेरी झुडपे तोडणे, प्लास्टिक कचरा संकलित करण्याचे काम प्रत्येक रविवारी लोकसहभागातून केले जात आहे. यासाठी शहरातील विविध सामाजिक व सांस्कृतिक संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते दर रविवारी घाणेवाडी तलावाच्या भिंतीवर सामूहिक श्रमदान करत आहेत.
या श्रमदान मोहिमेत रविवारी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनीही सहभाग नोंदवून श्रमदान केले. यावेळी कुंडलिका सीना रिज्यूवनेशन फाऊंडेशनच्या अध्यक्षा नूतन देसाई, रमेशभाई पटेल, सुनील रायठठ्ठा, मुख्याधिकारी संतोष खांडेकर, भाजप शहराध्यक्ष राजेश राऊत, अर्जुन गेही, शिवरतन मुंदडा, उदय शिंदे यांच्यासह महिला व बच्चे कंपनीची उपस्थिती होती.
लोकसहभाग महत्त्वाचाच: दानवे
काम कोणतेही असो त्यात लोकसहभाग महत्त्वाचा आहे. लोकसहभागातून सार्वजनिक स्वच्छता नदीपात्रातील कचरा प्लास्टिक काढण्यासह वृक्षारोपण, श्रमदान अभियान हा जालन्यातून नवीन पॅटर्न तयार झाला आहे. लोकसहभागातून शासन यंत्रणा जागृत होते. असे सांगताना घाणेवाडी जलाशयाच्या सांडव्याची तात्काळ दुरूस्ती करणे, तलावातील गाळ काढून पाणी साठवण क्षमता वाढविण्याच्या सूचनाही दानवे यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.