परतुरात दुर्मिळ चतुर्मुखी गणेश मंदिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2018 12:28 AM2018-01-21T00:28:31+5:302018-01-21T00:28:58+5:30
आष्टी येथे महाराष्ट्रात दुर्मिळ असलेले चतुर्मुखी गणेशाची मूर्ती असलेले मंदिर आहे.
शेषराव वायाळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : तालुक्यातील आष्टी येथे महाराष्ट्रात दुर्मिळ असलेले चतुर्मुखी गणेशाची मूर्ती असलेले मंदिर आहे. गेल्या शेकडो वर्षांपासून इथे गणेश जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. ही परंपरा कायम असून यंदाही गणेश जयंतीनिमित्त येथे धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत.
मनोकामना पूर्ण करणारा चतुर्मूखी गणपती म्हणून येथील गणपतीची ख्याती आहे. या गणेश मूर्तीचे महत्त्व म्हणजे चारही बाजूने एकाच दगडावर गणेशाची तोंडे असलेली भव्यदिव्य अशी मूर्ती याठिकाणी आहे.
आष्टी गावाचे पुरातन नाव अशापूर असे होते. या अशापुर नगरीत शेकडो वर्षापूर्वी येथील पेठ गल्लीत पेठातील देवी म्हणून ओळख असलेल्या रेणुका मातेच्या मंदिरासमोर या चतुर्मूखी गणेशाच्या मूर्तीची स्थापना करण्यात आलेली आहे. याच मूर्तीसमोर पेठेश्वर नावाने प्रसिद्ध असलेल्या महादेवाची पिंड आहे. गावातील जानकरा मंडळी सांगतात की चारही दिशेला तोंडे असलेला महाराष्ट्रातील गणपतीची ही एकमेव मूर्ती आहे. हा गणपतीची नवसाला पावणारा गणपती म्हणून ख्याती आहे. गणेश जयंतीनिमित्त गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी धार्मिक कार्यक्रम पार पडत आहेत. यात प्रामुख्याने गणेश यागाचे आयोजन करण्यात येत आहे. तीन दिवस चालणा-या या महोत्सवाची सुरुवात शुक्रवारपासून झाली असून, रविवारी या कार्यक्रमाची सांगता होणार आहे. गणेश यागदरम्यान दररोज गणेश मुर्तीस एक हजार अभिषेक करण्यात येत आहे. या वर्षीच्या गणेश यागचा मान गावातील सतीश नरहरी शहाणे यांना प्राप्त झाला आहे. या पूजेसाठी गावातील भक्त मंडळी देणगी देऊन पूजेचा मान मिळवितात. यासाठी कमिटीची स्थापना करण्यात आलेली असून चिठ्ठी काढून नाव निघेल त्याला पूजेचा मान मिळतो. गावातील सर्व समाजातील भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात.