चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योगायोग...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2019 12:53 AM2019-07-18T00:53:01+5:302019-07-18T00:53:47+5:30
दोन दिवसांपूर्वी आलेल्या चंद्र ग्रहणाचा असा योग तब्बल दीडशे वर्षानंतर आला आहे. यापूर्वी असेच चंद्रग्रहण हे १२ जुलै १८७० रोजी झाले होते.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : दोन दिवसांपूर्वी आलेल्या चंद्र ग्रहणाचा असा योग तब्बल दीडशे वर्षानंतर आला आहे. यापूर्वी असेच चंद्रग्रहण हे १२ जुलै १८७० रोजी झाले होते. त्यावेळी देखील गुरूपौर्णिमाच होती हे विशेष. गतवर्षीही गुरुपौर्णिमेस चंद्रग्रहण आले होते. यंदा तीन तास चाललेले हे चंद्रग्रहण अनेक अर्थाने अभ्यासकांसाठी महत्त्वाचे ठरल्याचे डॉ. बद्रीनारायण बारवाले महाविद्यालयातील प्रा. डॉ. प्रवीण कोकणे म्हणाले. जेईएस महाविद्यालयात २००१ पासून आकाश संशोधन प्रकल्प छोट्या तत्त्वावर सुरू करण्यात आले असून, तेथे १२ इंची टेलीस्कोप आहे. या दुर्बिणीच्या माध्यमातून ग्रहणासह आकाशातील अन्य प्रमुख ताऱ्यांचा अभ्यास केला जात आहे.
मंगळवारी मध्यरात्री खंडग्रास चंद्रग्रहण झाले. पृथ्वी, सूर्य यांच्यामध्ये चंद्र आल्याने हे खंडग्रास चंद्रग्रहण होते. विशेष म्हणजे तब्बल तीन तास चाललेले ग्रहण खगोल प्रेमींसाठी पर्वणी होती. परंतु जालन्यातील आकाशात ढगांची गर्दी असल्याने याचा पाहिजे तेवढा बारकाईने अभ्यास करता आला नाही. अशाही स्थितीत आपण काही सूक्ष्म निरीक्षणे नोंदवली आहेत. याचा नंतर तज्ज्ञांशी बोलून अर्थ समजावून घेणार आहोत. आज आलेले चंद्रग्रहण हे चंद्र हा पृथ्वीपासून अत्यंत जवळ असल्याने अनुक्रमे चंद्र आणि सूर्य ग्रहण दिसतात आणि त्यांचा अभ्यासही करता येतो. परंतु अशी ग्रहणे ही आकाशात नेहमीच होत असतात. परंतु, ती कितीतरी प्रकाशवर्ष दूर असल्याने दिसत नाहीत.
१८ वर्षापूर्वीच आणली होती निरीक्षणासाठी दुर्बिण
येथील जेईएस महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने देखील आकाश संशोधनाचे महत्त्व ओळखून महाविद्यालयात २००१ मध्ये १२ इंची टेलीस्कोप आणला. याचा मोठा लाभ आतापर्यंत २०० पेक्षा अधिक अभ्यासकांना झाल्याचेही कोकणे म्हणाले. दरम्यान या अभ्यासामुळे तीन जणांनी पीएच.डी. मिळवल्याचेही त्यांनी नमूद केले.
हे जेईएस मधील केंद्र सुरू करण्यासाठी व्यवस्थापन समितीसह तत्कालीन प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल, विद्यमान प्राचार्य डॉ. जवाहर काबरा, तत्कालीन प्रा. डॉ. पोपळघट, प्रा. डॉ. कुर्तडीकर, सध्याचे भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. एस.बी. बजाज यांच्या प्रेरणेतून हे निरीक्षण केंद्र सुरू असल्याचेही कोकणे यांनी आवर्जून सांगितले.