रावसाहेब दानवेच जालन्याचे खासदार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2019 01:13 AM2019-05-24T01:13:01+5:302019-05-24T01:13:21+5:30
भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांनी ६ लाख ९४ हजार ९४५ अशी घसघशीत मते मिळवित सलग पाचवा विजय नोंदविला.
लोकमत न्यूज नेटवर्क । जालना : भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि जालना लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार रावसाहेब दानवे यांनी ६ लाख ९४ हजार ९४५ अशी घसघशीत मते मिळवित सलग पाचवा विजय नोंदविला. पक्ष कार्यकर्ते, राज्यमंत्री अर्जुन खोतकर आणि शिवसैनिकांची मिळालेली साथ यामुळे खा. दानवे यांना हा विजय सहज सुकर झाला. त्यामुळे भाजपची जादू दिसून आली, तर पिछाडीवर पडलेल्या काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांना मोठा पराभव स्वीकारावा लागला. त्यांना ३ लाख ६४ हजार ३४८ मते मिळाली. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीचे शरदचंद्र वानखेडे हे तिसऱ्या स्थानावर राहिले.
जालना लोकसभा मतदारसंघातून भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे विलास औताडे यांच्या लढत होती. तर शरदचंद्र वानखेडे हे वंचित बहुजन आघाडीने उमेदवारी दिल्यामुळे चर्चेत होते. मात्र, दानवे यांचा मतदारसंघातील वरचष्मा बघता ही लढत एकतर्फीच होणार असल्याचे आधीच स्पष्ट झाले होते. निकालाने ती औपचारिकता पूर्ण केली.
जालना लोकसभा मतदारसंघाचा निकाल गुरूवारी जाहीर झाला. शहराजवळील दावलवाडी येथे संकेत फुडमध्ये सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच खा. रावसाहेब दानवे यांनी आघाडी घेतली. दुपारी एक वाजेपर्यंतच दानवे यांनी सव्वा लाख मतांची आघाडी घेतली आणि दानवे जिंकणार हे जवळपास निश्चितच झाले!