गुरुंच्या साधनेचा अभ्यास करणे हीच खरी गुरूपूजा-भास्कर महाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2018 01:07 AM2018-07-28T01:07:43+5:302018-07-28T01:08:04+5:30
गुरुंच्या साधनेचा अभ्यास करणे हीच खरी पूजा असल्याचे प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : भारतीय संस्कृतीमध्ये देवाला जितके महत्त्व आहे. त्यापेक्षा थोडे अधिकच गुरु आणि सद्गुरु यांना आहे. मानवी जीवनातील जडण घडणीत गुरुंचे स्थान हे अनन्य साधारण आहे. ज्या गुरुंमुळे आपल्या जीवनाला आकार मिळतो. ज्यांच्यामुळे आपल्याला प्राप्त नरजन्माचे खऱ्या अर्थाने सार्थक होते. त्यामुळेच गुरुंच्या साधनेचा अभ्यास करणे हीच खरी पूजा असल्याचे प.पू. भास्कर महाराज देशपांडे (भाऊ) यांनी सांगितले.
येथील नवनाथ संस्थान येथे शुक्रवारी गुरुपौर्णिमा निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी भजन, आरती, कीर्तन होऊन नंतर महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.
पुढे बोलताना देशपांडे महाराज म्हणाले की, आषाढ पौर्णिमा हा गुरुपुजनाचा दिवस आहे. या दिवशी शाळा, मठ, मंदिर, आश्रमात, गुरुकुलात गुरुंचे पूजन केले जाते. आपल्या जीवनाला आकार देण्या-या गुरुजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. सदगुरुंनी दाखवून दिलेल्या मार्गाने चालणे म्हणजेच गुरुपूजन होय. आपल्या भारतीय संस्कृतीत गुरु शिष्याच्या नात्याला मोठे महत्त्व आहे, असेही ते म्हणाले. यावेळी दत्तात्रय देशपांडे, भगवान देशपांडे, दिलीप ओस्तवाल, सखाराम देशपांडे, गोविंद लामधडे, कौशल देशपांडे, प्रीतम पारेख, कपिल शर्मा, महेश जोशी, महेश दुसे, गिरीश चपळगावकर, निखिल देशपांडे, मनीष पटेल, दत्ता खरात, सुनील वैद्य, संजय कंठाळे, विजय चव्हाण, योगेश पाटील, गोपाल शर्मा, चिन्मय चौथाईवाले आदी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.