वसुली अधिकारीच निघाला आरोपी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2019 12:48 AM2019-03-28T00:48:50+5:302019-03-28T00:48:53+5:30
दोन दिवसांपूर्वी राजूर जवळ झालेल्या लूट प्रकरणात फिर्यादीच असलेला महिन्द्रा कंपनीचा वसुली अधिकारी आरोपी निघाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : दोन दिवसांपूर्वी राजूर जवळ झालेल्या लूट प्रकरणात फिर्यादीच असलेला महिन्द्रा कंपनीचा वसुली अधिकारी आरोपी निघाला आहे. आरोपी सतीश घोडे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन न्यायालयासमोर हजर केले असता, दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
महिंद्रा रूरल फायनान्स कंपनीने राजूर परिसरात बहुतांश नागरिकांना घर बांधकामासाठी कर्ज वितरण केलेले आहे. दरमहा कर्जाची वसुली केली जाते. २५ मार्च रोजी फायनान्स कंपनीचे वसुली अधिकारी सतीश सारंगधर घोडे (रा.पिंपळगाव कोलते) हे जवखेड्याहून राजूरकडे येत असताना दुपारी त्यांना दोन अनोळखी इसमांनी डोळ्यात मिरची पूड टाकून कर्जदारांकडून वसूल केलेले चार लाख २८ हजार रुपये बॅगेसह पळवून नेल्याची तक्रार राजूर पोलिसात दिली. होती.
यावरून अनोळखी दोन जणाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता. परंतु हसनाबाद ठाण्याचे स.पो.नि.सीताराम मेहेत्रे यांनी महिन्द्रा फायनान्स कंपनीच्या कर्ज वसुली संदर्भात माहिती हस्तगत करून घोडे याने दिलेल्या तक्रारीत काही गोष्टी लपवल्याचे लक्षात आले. तसेच कर्जदाराकंडे जाऊन चौकशी केली असता, त्यांनी पावत्या फाडल्या मात्र रक्कम दिली नसल्याचे समोर आले.