मांसाहारी जेवण देण्यास नकार; चिडलेल्या शेजाऱ्याने केला वृद्धाचा खून
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 11:42 AM2022-03-30T11:42:07+5:302022-03-30T11:42:28+5:30
पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे
कुंभार पिंपळगाव : मांसाहारी जेवण देण्यास नकार दिल्याने शेजाऱ्यानेच वृद्धाचा खून केल्याची धक्कादायक घटना घनसावंगी तालुक्यातील पिंपरखेड बुद्रूक येथे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. मारुती नरोटे (वय ६५) असे मृताचे नाव आहे. पोलिसांनी तत्काळ संशयित आरोपी पांडुरंग ज्ञानदेव हांगे (३०) याला अटक केली आहे.
पिंपरखेड बुद्रूक गावातील मारुती नरोटे हे रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास मुलगा राजाभाऊ नरोटे, पुतण्या होनाजी नरोटे यांच्यासोबत जेवत होते. ९ वाजेच्यासुमारास शेजारी राहणारा पांडुरंग ज्ञानदेव हांगे हा दारू पिऊन तेथे आला. त्याने नरोटे यांना मांसाहारी जेवण मागितले. परंतु, त्यांनी जेवण देण्यास नकार दिल्याने आरोपी पांडुरंग हांगे याने राजाभाऊ नरोटे यांच्या डोक्यात लोखंडी फुकणी मारली. मारुती नरोटे व पुतण्या होनाजी नरोटे हे त्याला बाजूला करण्यासाठी केले असता, त्याने त्यांनाही मारहाण केली. यात मारुती नरोटे यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. याची माहिती सोमवारी सकाळी घनसावंगी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविला. याप्रकरणी मृताची पत्नी सुशीलाबाई नरोटे यांच्या फिर्यादीवरून सोमवारी सकाळी घनसावंगी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
आरोपी अटकेत
संशयित आरोपी पांडुरंग ज्ञानदेव हांगे हा घटनास्थळावरून फरार झाला होता. सोमवारी दुपारी तो घरी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून पोलिसांना त्याला घरातून ताब्यात घेतले. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन, पोलीस उपनिरीक्षक प्रदीप डोलारे, बाबासाहेब हरिचंद्रे, पोहेकॉ. श्यामसुंदर देवडे, पोना. रामदास केंद्रे, पोकॉ. सुनील वैद्य, पोकॉ. बाळासाहेब मंडलिक, पोकॉ नवनाथ राऊत, पोकॉ. नारायण घुनावत आदींनी केली आहे.