जालना दुय्यम निबंधक कार्यालयात रजिस्ट्रीच्या कामांचा खोळंबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2018 12:30 AM2018-01-20T00:30:31+5:302018-01-20T00:30:40+5:30
येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे (रजिस्ट्री) मुख्य सर्व्हर संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रजिस्ट्रीच्या कामांचा खोळंबा होत आहे. रजिस्ट्रीसाठी येथे येणा-या नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत असून, दिवसभरात केवळ ४० जणांची नोंदणी झाली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील दस्त नोंदणीचे (रजिस्ट्री) मुख्य सर्व्हर संथगतीने सुरू आहे. त्यामुळे रजिस्ट्रीच्या कामांचा खोळंबा होत आहे. रजिस्ट्रीसाठी येथे येणा-या नागरिकांना दिवसभर ताटकळत बसावे लागत असून, दिवसभरात केवळ ४० जणांची नोंदणी झाली.
दुय्यम निबंधक कार्यालयात दररोज कोट्यवधी रुपयांच्या मालमत्ता खरेदी-विक्रीचे व्यवहार होतात. शेती, प्लॉट्स, घर खरेदी-विक्रीच्या कायदेशीर दस्त नोंदणीसाठी या कार्यालयात येणा-यांची संख्या अधिक आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व कामकाज आता आॅनलाईन झाले आहे. मात्र, आॅनलाईन कामाजासाठी वापरण्यात येणारे मुख्य सर्व्हर कायम डॉऊन राहत असल्याने एका दस्त नोंदणीसाठी ४० ते ५० मिनिटांचा वेळ लागत आहे. सर्व्हरमुळे कामांचा वेगही मंदावला असून, पुर्वी दिवसभरात होणा-या शंभर रजिस्ट्रींची संख्या आता ४० पर्यंत खाली आली आहे. त्यामुळे दस्त नोंदणीतून मिळणा-या महसूलावरही परिणाम होत आहे. दस्त नोंदणी झाल्यानंतर व्यवहाराच्या आॅनलाईन नोंदी झालेली कागदपत्रे लगेच देणे आवश्यक असताना, यासाठी संबंधितांना दुसºया दिवशी बोलावले जात आहे. परिणामी ग्रामीण भागातून येणा-या नागरिकांना एकाच कामासाठी दोन दोन चकरा माराव्या लागत आहेत. या कामांचा बाहेर गावाहून आलेल्या नागरिकांना काम न झाल्यास मनस्ताप सहन करावा लागत आहे. नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी या कार्यालयात येणा-या एखाद्या जोडप्याला गैरसोयींचा सामना करावा लागतो. कार्यालयातील सर्व्हरची गती वाढविण्याची मागणी नागरिकांमधून केली जात आहे.
दुय्यम निबंधक कार्यालयातील सर्व कामकाज आॅनलाईन झाले. ही चांगली बाब असली, तरी सर्व्हर डाऊन राहत असल्याने एका नोंदणीसाठी तासनतास थांबावे लागते आहे. येथील सर्व्हरची गती वाढविण्यासाठी संबंधित विभागाने आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्यायला हव्या.
- ओमप्रकाश चितळकर,
बांधकाम व्यावसायिक