नोंदणीचे सर्व्हर जळाले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2018 12:49 AM2018-04-18T00:49:29+5:302018-04-18T00:49:29+5:30
नॅशनल कोलेटर सर्व्हिसेस लिमीटेड (एन.सी.एम.एल) या मुंबई स्थित कंपनीचे आॅनलाईनचे सर्व्हरजळाल्याने तूर, हरभरा आदी शेतमालाचे आॅनलाईन नोंदणी तसेच खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : नॅशनल कोलेटर सर्व्हिसेस लिमीटेड (एन.सी.एम.एल) या मुंबई स्थित कंपनीचे आॅनलाईनचे सर्व्हरजळाल्याने तूर, हरभरा आदी शेतमालाचे आॅनलाईन नोंदणी तसेच खरेदी विक्रीचे सर्व व्यवहार ठप्प झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.
हमीभावाने शेतमाल खरेदी करतांना पादर्शकता यावी यासाठी नाफेडने नॅशनल कोलेटरल सर्व्हिसेस या कंपनीकडे हमीभावाने आॅनलाईन नोंदणीसह, खरेदी विक्री आणि शेतक-यांच्या देयकाबाबत हिशोब ठेवण्याचे काम देण्यात आले आहे. मात्र या कंपनीचे १६ एप्रिल रोजी सर्व्हर जळाल्याने राज्यातील हमीभावाने आॅनलाईन नोंदीसह शेतमाला खरेदीला बे्रक लागल्याने शेतकरी हैराण झाले आहेत. खरेदीबाबत शेतकºयांना पाठविण्यात येणारे मेसेज बंद झाल्याने नोंदणीकृत शेतकरी हमीभाव केंद्रावर चकरा मारून याबाबत विचारणा करीत आहेत.
विशेष म्हणजे राज्यभरात हमीभावाने तूर नोंदणी बंद करण्याचे आदेश नाफेडकडून राज्यातील जिल्हामार्र्केटींग विभागाला दिले आहेत. यामुळे आॅनलाईन नोंदणीसाठी शेतक-याकडे दोनच दिवस उरले असतांना नोंदणीची आॅनलाईन प्रक्रिया बंद पडल्याने शेतक-यांतून संताप व्यक्त होत आहे. मंगळवारी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी आॅनलाईन नोंदणीसाठी हमीभाव केंद्रावर गर्दी केली होती. मात्र सर्व्हर बंद असल्याने शेतक-यांची आॅनलाईन नोंदणी करता आली नाही. परिणामी नोंदणीसाठी आलेल्या शेतक-यांनी हमीभाव केंद्रावरच ठिय्या देत आपला संताप व्यक्त केला. एकूणच तूर खरेदीतील गोंधळाने शेतकरी वेतागला आहे.