सुतार मंचच्या माध्यमातून पुनर्विवाहाची कोंडी फोडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:30 AM2019-07-28T00:30:48+5:302019-07-28T00:31:10+5:30
दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी समाज हा फारसा जागृत नव्हता. अंध परंपरा आणि समाजातील अनेक नागरिक काय म्हणतील, या भीतीपोटी विधवेचा पुनर्विवाह करणे म्हणजे यक्ष प्रश्न होता. तोच प्रश्न दोनशे वर्षानंतरही कायम असल्याचे वास्तव सुतार समाज मंचचे जिल्हाध्यक्ष राजेश भालेकर यांनी सांगितले.
संजय देशमुख ।
लोकमत न्यूज नेटवर्क
दोनशे ते अडीचशे वर्षापूर्वी समाज हा फारसा जागृत नव्हता. अंध परंपरा आणि समाजातील अनेक नागरिक काय म्हणतील, या भीतीपोटी विधवेचा पुनर्विवाह करणे म्हणजे यक्ष प्रश्न होता. तोच प्रश्न दोनशे वर्षानंतरही कायम असल्याचे वास्तव सुतार समाज मंचचे जिल्हाध्यक्ष राजेश भालेकर यांनी सांगितले. या विवाहमंचच्या माध्यमातून त्यांनी मोठ्या प्रयत्नाने जवळपास ३९ विवाह जुळविले आहेत. मुळात त्यांचीच आर्थिक परिस्थिती जेमतेम असतानाही समाजाचे आपण काही देणे लागतो, यातूनच ते सामाजिक बांधिलकी जपत आहेत.
पुनर्विवाहात कुठल्या अडचणी आहेत ?
एकीकडे आपण साक्षर होऊन शिक्षण आणि उच्च शिक्षण घेतले. परंतु ज्यांनी हे शिक्षण घेतले. त्यांच्याच कुटुंबामध्ये क्षुल्लक कारणावरून टोकाचे वाद होऊन विवाह संस्थाच धोक्यात आली आहे. पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी अशिक्षित पती-पत्नीमध्ये समेट घडविण्यासाठी जेवढा वेळ लागत नाही. तेवढा वेळ शिक्षित असलेल्या जोडप्यांसाठी खर्च करावा लागतो. विधवा मुलींचा तर प्रश्नच वेगळा आहे. नियतीने त्यांच्यावर ही वेळ आणली आहे. हे समजून घेण्यास समाज आजही तयार नसल्याने मोठी खंत आहे.
किती विवाह जुळविले ?
सुतार समाज मंचच्या माध्यमातून विधवा तसेच घटस्फोटित मुला-मुलींचे ३९ विवाह गेल्या तीन वर्षात जुळविले आहेत. तर अनेकांचे संसार तुटण्यापासून मंचने पुढाकार घेतला. यात समाजबांधवांचाही सिंहाचा वाटा आहे.
हलाखीतून भरारी
मूळचे जालना तालुक्यातील गोंदेगाव येथील असलेले भालेकर यांनी शालेय शिक्षण पोटाला भाकरी मिळत नसल्यामुळे अर्धवट सोडले. हॉटेलमध्ये काम करून उपजीविका भागविली. परंतु जिद्द सोडली नाही. याकामी मला समाज बांधवांसह इतर समाजांतूनही हिंमत मिळत गेली आणि त्यातूनच आज मी हे सामाजिक कार्य करतो.