हाडांच्या विविध आजारांवर फिजिओथेरपीची मात्रा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 12:41 AM2019-12-02T00:41:03+5:302019-12-02T00:41:33+5:30
जिल्हा रूग्णालयातील फिजिओथेरपी विभागात महिन्याकाठी ३०० वर रूग्ण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेऊन व्यायाम करीत आहेत.
विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : हाडांचा आजार असो किंवा शस्त्रक्रियेनंतरचे उपचार असोत डॉक्टरांनी दिलेल्या औषधांबरोबर फिजिओथेरपी उपचार घेणे गरजेचे असते. जिल्हा रूग्णालयातील फिजिओथेरपी विभागात महिन्याकाठी ३०० वर रूग्ण तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घेऊन व्यायाम करीत आहेत. त्यामुळे अनेक रूग्णांना हाडाच्या दुखण्यातून आराम मिळाला आहे.
अनियमित आहार, अपुरी झोप, सततचा प्रवास, बैठे काम, रस्त्यावरील खड्ड्यांचे साम्राज्य, अपघात व इतर अनेक कारणांनी हाडाचे विविध आजार नागरिकांना जडतात. यात सर्वाधिक रूग्ण हे मणका, मान दुखी, कंबरदुखी, टाचा दुखणे, पाठ दुखणे आदी विविध आजारांनी त्रस्त असतात. विशेषत: मणक्याच्या आजाराने त्रस्त झालेले अनेक रूग्ण दिसून येतात. जुनी दुखणी, अपघातातील दुखणी, बदलत्या जीवनशैलीमुळे येणारे आजार, हाडांमधील जुनी दुखणी बंद करणे, शस्त्रक्रियेनंतर हात, पायाची पूर्ववत हलचाल व्हावी, यासाठी फिजिओथेरपी उपचार पध्दतीचा अवलंब केला जातो. तज्ज्ञ डॉक्टरांनी दिलेली औषधे घेण्याबरोबर फिजिओथेरपी उपचार घेणेही तितकेच महत्वाचे आहे. ही गरज ओळखून जालना येथील जिल्हा रुग्णालयात फिजिओथेरपी विभाग सुरु करण्यात आला आहे.
या विभागात महिन्याकाठी ३०० च्या आसपास रूग्ण फिजिओथेरपी उपचार घेण्यासाठी येतात. या विभागातील तज्ज्ञ डॉ. अमित जैस्वाल (पी.टी.), डॉ. पायल जैस्वाल (पी.टी.) हे रूग्णाला जो आजार आहे त्यावर उपचार करतात. कोणत्या आजारात ७ दिवस, कोणत्या आजारात १५ ते २० दिवस उपचार केले जातात. या विभागातील वॅक्स बाथ, शॉट वेट डायथर्व्ही, ट्रॅक्शन, टेन्स, आयएफटी-आयआरआर, यूव्हीआर, सीपीएम, मसल स्टीमयुलेटर, शोल्डर व्हील, स्टॅटीक बायसिकल आदी विविध यंत्रणेचा वापर उपचारासाठी केला जातो. नियमित उपचार आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम केल्यानंतर रूग्णांना आजारातून मुक्तता मिळत आहे.
हाडाची शस्त्रक्रिया झाली असेल अशा रूग्णांना फिजिओथेरपी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करणे गरजेचे असते. असे अनेक रूग्ण येथील विभागात उपचारासाठी येतात. योग्य पध्दतीने नियमित व्यायाम केल्याने शस्त्रक्रियेनंतरही रूग्णांच्या हात- पायांची पूर्वीप्रमाणे हालचाल होण्यास मदत होऊ लागली आहे.
खासगी सेंटरमध्ये फिजिओथेरपीचे आठ ते दहा दिवस उपचार घ्यायचे म्हटलं की हजारो रूपये खर्च करावे लागतात. मात्र, जिल्हा रूग्णालयात सुरू असलेल्या फिजिओथेरपी विभागामुळे समाज घटकातील गरजू रूग्णांना मोठा आधार मिळाला आहे.
त्यामुळे शहरासह ग्रामीण भागातील गरजू रूग्णांनी शासकीय रूग्णालयातील फिजिओथेरपी विभागात जाऊन तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली आपल्या आजारावर योग्य पध्दतीने उपचार घेण्याची गरज आहे.