अतिक्रमण काढूनही रहदारीला अडथळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 12:32 AM2020-03-04T00:32:17+5:302020-03-04T00:32:40+5:30
आता पुन्हा रस्त्यालगत सार्वजनिक जागेवर शीतपेयांची दुकाने थाटल्याने वाहतूक कोंडी होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जाफराबाद : जाफराबादचा शहराचा दिवसेंदिवस विस्तार होत आहे. त्यामुळे वाहनांच्या संख्येतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. वाहनांची संख्या वाढल्याने पार्किंगचा प्रश्न कायम ऐरणीवर येत आहे. वर्षभरापूर्वीच शहरातील अतिक्रमण काढण्यात आले होते. त्यातच आता पुन्हा रस्त्यालगत सार्वजनिक जागेवर शीतपेयांची दुकाने थाटल्याने वाहतूक कोंडी होत आहे. आठवडी बाजाराचा दिवस असला की रस्त्यावरून चालणे अवघड झाले आहे. वाहनधारकही पार्कींग झोन नसल्यामुळे आपल्या सोयीनुसार गाड्या उभ्या करीत आहे.
जाफराबाद शहरात सार्वजनिक रस्त्यावर अवैध व्यवसाय सुरू आहे. येथील व्यावसायिकांनी आपल्या मालकीची जागा सांगून रस्त्यावर शितपेय, टी -हाऊस, पानटपरी उभारून अनेकांनी व्यवसाय सुरू केला आहे. काहींनी इतर परप्रांतीयांना भाड्याने देऊन व्यवसाय सुरू केला आहे. याकडे नगर पंचायत, पोलीस प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. यामुळे सध्या शहरात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्यावतीने वर्षभरापूर्वी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेमुळे शहरातील रस्ते मोकळे झाले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा शहरातील पार्कींगचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरात पार्कींग झोन तयार करण्याची मागणी शाम भाग्यवंत यांनी केली आहे.
शहरातील अहिल्यादेवी होळकर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी चौक, जालना रोड, बसस्थानक रोड व्यावसायिकांनी रस्त्यावर साहित्य ठेवून व्यापून घेतला आहे. त्यात अवैध वाहतूक करणाऱ्यांची मुजोरी मोठी आहे. भरधाव वेगात वाहने चालवून जाफराबादकरांच्या जिवाशी खेळ करीत आहे.
दुकानात येणा-या ग्राहकांसाठी गाडी पार्किंग सुविधा नसल्याने आपल्या सोयीनुसार ते रस्त्यावरच मिळेल त्या ठिकाणी गाडी लावून रहदारीस अडथळा निर्माण करीत आहे. नगर पंचायत, पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करीत आहे. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.