लाठीचार्ज ही दडपशाहीला सुरूवात, आमदार-खासदार देशाचे मालक नाहीत: प्रकाश आंबेडकर

By विजय मुंडे  | Published: September 5, 2023 01:53 PM2023-09-05T13:53:26+5:302023-09-05T13:55:20+5:30

शासनच निर्णय घेतं आणि शासन उदासिन असेल तर निर्णय कोण घेणार?

Repressive Era Begins, MLAs, MPs Not Owners Of Country: Prakash Ambedkar | लाठीचार्ज ही दडपशाहीला सुरूवात, आमदार-खासदार देशाचे मालक नाहीत: प्रकाश आंबेडकर

लाठीचार्ज ही दडपशाहीला सुरूवात, आमदार-खासदार देशाचे मालक नाहीत: प्रकाश आंबेडकर

googlenewsNext

जालना : मनोज जरांगे यांनी मरणाची भाषा करू नये. लढणारे मेले तर लढणार कोण? मरण्यापेक्षा मारा आणि राज्य करा. आमदार- खासदार, मंत्री देशाचे मालक नाहीत. मतदार मालक आहे. त्यामुळे प्रश्नांची जाण असणाऱ्यांना संसदेत पाठवा. जोपर्यंत प्रश्नांची जाण असणारे संसदेत जाणार नाहीत तोपर्यंत प्रश्न तसाच राहणार आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांनी केले.

मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी येथे उपोषण करणारे मनोज जरांगे यांची डॉ. आंबेडकर यांनी सोमवारी भेट घेतली. त्यावेळी ते बोलत होते. १९ वर्षे मी लोकसभेत या प्रश्नाला अनेकवेळा उचलण्याचा प्रयत्न केला. परंतु, ज्यांच्या संबंधित हा प्रश्न आहे त्यांनी सभागृहात उदासिनता दाखविली. त्यामुळे आपण कोणाला दोष देत नाही. कोणावर टिका करून हा प्रश्न सुटणार नाही. ज्यांना या प्रश्नांची जाण आहे अशी माणसं सभागृहात जात नाहीत तोपर्यंत या प्रश्नाचा निकाल लागेल, असे मला वाटत नाही. शासनच निर्णय घेतं आणि शासन उदासिन असेल तर निर्णय कोण घेणार? असे अनेक प्रश्न आहेत. त्यापैकी आरक्षण एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तो सोडविला गेला पाहिजे. त्यामुळे तुम्ही मरणाची भाषा करू नका. लढणारी माणसं निघून गेली तर लढणार कोण? मरण्यापेक्षा मारा आणि राज्य करा असे आपण म्हणतो. आमदार, खासदार, मंत्री देशाचे मालक नाहीत. मतदार हे मालक आहेत. पाच वर्षानंतर त्यांना हकला आणि सत्तेत या. जे पाहिजे ते करून घ्या. आपण तब्येत बिघडणार नाही याची काळजी घ्या. आंदोलन सुरू ठेवा. आम्ही सोबत आहोत, असेही डाॅ. आंबेडकर म्हणाले.

पोलिसांनी लाठ्या-काठ्या चालवू नयेत
दडपशाही कालखंडाला सुरूवात झाली आहे. माझी पोलिसांना विनंती आहे. तुम्ही माणूस आहात, राज्यकर्त्यांचे गुलाम नाहीत. तुम्ही व्यक्ती आहात. राज्यकर्त्यांनी सांगितले तर कृपया पुन्हा झोडून काढू नका, अशी विनंती आहे. झालेली घटना चुकीची आहे. राज्यकर्ता आदेश लेखी देत नाही. त्यामुळे झालेला लाठीचार्ज हा निषेधार्ह असून, पोलिसांनी मानवतेने वागावे, असा सल्लाही डॉ. आंबेडकर यांनी दिला.

Web Title: Repressive Era Begins, MLAs, MPs Not Owners Of Country: Prakash Ambedkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.