बंद शाळा परिसरात सरपटणारे प्राणी; झाडे-झुडपांचा विळखा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 04:37 AM2021-09-16T04:37:39+5:302021-09-16T04:37:39+5:30
जालना : कोरोनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी शाळा व परिसरातील स्वच्छतेकडे ...
जालना : कोरोनामुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा बंद पडल्या आहेत. मुलांचे ऑनलाइन शिक्षण सुरू असले तरी शाळा व परिसरातील स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. जिल्ह्यातील काही शाळा व परिसरात तर झाडे-झुुडपांसह गवत वाढले असून, सरपटणारे प्राणीही आढळून येत आहेत.
कोरोनामुळे शाळा बंद पडल्या आणि मुलांना ऑनलाइन ज्ञानदान सुरू करण्यात आले. प्रारंभीच्या काळात शिक्षकांनाच कारवाईच्या मोहिमेत, सर्वेक्षणाच्या मोहिमेसह कोरोनाच्या इतर कामांमध्ये लावण्यात आले होते. कोरोना बाधितांची संख्या कमी झाल्यानंतर शिक्षकांना पन्नास टक्के उपस्थितीत शाळांमध्ये हजेरी लावण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यानुसार जिल्ह्यातील विविध शाळांमधील उपक्रमशील शिक्षक मुलं शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी विविध उपक्रम राबवीत आहेत. काही शिक्षक मुलांच्या घरी जाऊन ज्ञानदानाचे काम करीत आहेत. शैक्षणिक गुणवत्ता चांगली राहावी, यासाठी शिक्षकांचे प्रयत्न सुरू आहेत. याकामी मोजक्याच खोल्यांचा वापर होत आहे. परिणामी इतर खोल्या आणि परिसर स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे काही शाळांच्या आवारात गाजर गवत, काटेरी झुडपे उगवली आहेत, तर काही शाळांच्या परिसरात सरपटणारे प्राणी दिसत आहेत.
वर्गखोल्यांमधील धूळ हटेना
कोरोनामुळे प्राथमिकच्या शाळा मागील दीड- दोन वर्षांपासून बंद अवस्थेमध्ये आहेत. त्यामुळे शाळांमधील स्वच्छतेकडे दुर्लक्ष झाले आहे.
त्यात अनेक शाळांमध्ये शिपायांची पदे रिक्त आहेत. परिणामी स्वच्छतेची कामे होत नसल्याने संबंधित अनेक शाळांच्या वर्गखोल्यांमध्ये धूळच धूळ साचल्याचे चित्र दिसून येत आहे.
जबाबदारी कोणाची ?
शाळा स्वच्छतेबाबत संबंधित शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शिक्षण विभागाकडून सूचना देण्यात आलेल्या आहेत.
त्यात शासनस्तरावरून कोरोनामुक्त गावांमध्ये शाळा सुरू करण्याबाबतही विचार सुरू आहे. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आपल्या शाळा, परिसर स्वच्छतेकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे.
शिक्षकांची उपस्थिती किती?
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्राथमिक शाळांमधील शिक्षकांपैकी ५० टक्के शिक्षक दैनंदिन उपस्थित राहणे गरजेचे आहे.
त्यानुसार जिल्ह्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षक एक दिवसाआड शाळेवर येऊन आपले कर्तव्य बजावत आहेत.
स्वच्छतेबाबत सूचना
शाळांमधून मुलांना ऑनलाइन शिक्षण दिले जात आहे. त्यामुळे शाळा व परिसर स्वच्छ ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचना संबंधितांना पुन्हा एकदा दिल्या जातील.
- कैलास दातखिळ, शिक्षणाधिकारी