'आता आरक्षण हेच औषध'; मनोज जरांगेंचा वैद्यकीय तपासणीस नकार, पथकास परत पाठवले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2023 02:21 PM2023-10-26T14:21:57+5:302023-10-26T14:23:45+5:30
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाचा आज दूसरा दिवस आहे
अंतरवाली सराटी: मनोज जरांगे यांचा मराठा आरक्षणासाठी बेमुदत उपोषणाचा आजचा दूसरा दिवस आहे. आज देखील ते केवळ दोन घोट पाणी पिऊन आहेत. दरम्यान, त्यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी आलेल्या पथकास जरांगे यांनी परत पाठवले.मराठा आरक्षण हाच उपचार आहे, सरकारकडून आरक्षणाशिवाय काहीच घेणार नाही,असा पुनरुच्चार जरांगे यांनी केला.
राज्य सरकारला आरक्षण जाहीर करण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानंतर मनोज जरांगे यांनी पुन्हा एकदा बेमुदत उपोषण सुरू केले आहे. त्यांना पाठिंबा देण्यासाठी अनेक गावांमध्ये साखळी उपोषण सुरू झाले आहे. तसेच राजकारण्यांना गावबंदी देखील करण्यात आल्याने आंदोलनाची तीव्रता व्यापक प्रमाणात दिसून येतेय.दरम्यान, मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषणादरम्यान पाणी देखील पिणार नाही हे जाहीर केले. बुधवारी छत्रपती संभाजीराजे यांच्या विनंतीवरून त्यांनी पाण्याचे दोन घोट प्राशन केले. आज देखील त्यांनी केवळ दोन घोट पाणी पिले आहे. त्यांच्या प्रकृतीमध्ये बदल दिसून येत असल्याने आज दुपारी शासनाचे वैद्यकीय पथक तपासणीसाठी उपोषणस्थळी दाखल झाले. मात्र, जरांगे यांनी तपासणीस नकार देत पथकाला परत पाठवले. आता सरकारकडून फक्त आरक्षण घेणार, उपचाराची गरज नाही, असे त्यांनी जाहीर केले.
प्रधानमंत्री मोदीवरील प्रश्न टाळले
मला काहीही झालेले नाही. सरकारकडून आता फक्त आरक्षण घेयचे, इतर काही नको.माझ्यासाठी आरक्षण हाच उपचार आहे,असे जरांगे यांनी उपचारास नकार देताना स्पष्ट केले. दरम्यान, काल मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस दिल्लीला गेले होते, आज प्रधानमंत्री मोदी महाराष्ट्रात आले आहेत यावर प्रतिक्रिया विचारली असता आता फक्त उपचारावर बोलू असे जरांगे म्हणाले.