ओबीसी अन् मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट वेगवेगळं असलं पाहिजे: प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 12:38 PM2024-06-20T12:38:52+5:302024-06-20T12:40:22+5:30
एखादी व्यवस्था स्थिर होऊन शाश्वत झालेली आहे. तेव्हा त्याच्यामध्ये कोणालातरी घुसडण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक सलोखा बिघडला जातो.
- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : ओबीसीच अन् मराठ्यांच्या आरक्षणाचं ताट वेगवेगळं असलं पाहिजे. महाराष्ट्रमध्ये सामाजिक सलोखा राहिला पाहिजे. मात्र, मराठा आणि ओबीसी यांना एकमेकांसमोर विधानसभा निवडणुकीपर्यंत भिडवत ठेवतील अशी माझी धारणा आहे, असे स्पष्ट मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आज, गुरुवारी सकाळी येथे व्यक्त केले. ओबीसी नेते उपोषणार्थी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची आज सकाळी वडीगोद्री येथे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी भेट घेत त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
पुढे बोलताना अॅड. आंबेडकर म्हणाले, ओबीसी आणि मराठा समाज अनेक वेळा आमनेसामने आलेला आहे. परिस्थिती स्फोटक असल्याची जाणीव शासनाला मी अनेक वेळा करून दिलेली आहे. मात्र, शासनाकडून कुठलेही पाऊल पडताना दिसत नाही.
राजकीय पक्षांच्या नेत्यांना देखील याबाबत भूमिका घ्यायला आपण सांगितलं पाहिजे. भटक्या विमुक्तांना आपले हक्काचे शाश्वत आरक्षण निघून जाते की काय ? अशी भीती आहे. याबाबत शासनाने भूमिका जाहीर करावी, अशी मागणी देखील अॅड. आंबेडकर यांनी केली.
सामाजिक सलोखा बिघडत आहे
एखादी व्यवस्था स्थिर होऊन शाश्वत झालेली आहे. तेव्हा त्याच्यामध्ये कोणालातरी घुसडण्याचा प्रयत्न केला तर मग सामाजिक सलोखा बिघडला जातो. मराठा समाजासाठी कायम आरक्षण द्यायच असेल तर त्यांचे वेगळे ताट दिले पाहिजे, अशी भूमिका अॅड. आंबडेकर यांनी मांडली. तसेच संविधानावरती ओबीसी विश्वास ठेवला हा सर्वात मोठा आरक्षण वाचवण्याचा भाग असू शकतो, असे मला वाटते. बीजेपी संविधान बदलणार या प्रचारामुळे जनतेचा कल महाविकास आघाडीकडे गेला. सगेसोयरे शब्द जेते म्हणत होते त्याची व्याख्या तुम्ही करून घेतली पाहिजे किंवा कोणीतरी करून द्यायला पाहिजे, जोपर्यंत व्याख्या काय होते त्यातले नेमकं काय ते कळत नाही, असेही अॅड. आंबडेकर म्हणाले.
प्रकाश आंबेडकरांच्या आग्रहाने पाणी पिले
व्हि.पी सिंग यांनी पाणी घेतलं नसल्यामुळे त्यांच्या किडनी वरती परिणाम झाला होता. त्यामुळे किमान पाणी घ्यावं उपोषण सुरू ठेवावे, अशी विनंती प्रकाश आंबेडकर यांनी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांना केली. त्यानंतर त्यांनी दोन्ही उपोषणार्थीना पाणी दिले.
मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपचार घेणार नाही
ओबीसी नेते उपोषणकर्ते लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. सात दिवसांच्या उपोषणामुळे हाके आणि वाघमारे यांची प्रकृती दिवसेंदिवस खालवत चाललीय. डॉक्टरांचा दोन्ही उपोषणकर्त्यांना उपचार घेण्याचा सल्ला दिलाय. मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत उपचार न घेण्यावर दोन्ही उपोषणकर्ते ठाम आहेत.