सन्मान लेकींचा! टेंभुर्णी ग्रामपंचायततर्फे मुलींच्या नावाने बँकेत एफडी, नवरीला माहेरची साडी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2023 05:25 PM2023-02-23T17:25:35+5:302023-02-23T17:26:04+5:30
मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी ग्रामपंचायतीची हटके योजना
- नसीम शेख
टेंभुर्णी ( जालना) : मुलींचा जन्मदर वाढावा म्हणून शासन वेगवेगळे उपक्रम आणि योजना राबवत आहे. शासनाच्या या उपक्रमातून प्रेरणा घेत जाफराबाद तालुक्यातील टेंभुर्णी ग्रामपंचायतीने सन्मान लेकींचा हा अनोखा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमांतर्गत गावात जन्माला येणाऱ्या मुलींच्या नावाने बँकेत ठराविक रक्कम ग्रामपंचायत फिक्स डिपॉझीट करणार आहे. तसेच विवाह होऊन जाणाऱ्या प्रत्येक नववधूला पैठणी साडी भेट देऊन सन्मान करणाा आहे. ही योजना शिवजयंतीपासून ग्रामपंचायतीने लागू केली आहे.
या उपक्रमात गावातील जन्म घेणाऱ्या प्रत्येक मुलीच्या नावाने दोन हजार शंभर रुपये एफडी केली जाणार आहे. याशिवाय गावातील ज्या मुलीचे लग्न होईल तिला माहेरचा आहेर म्हणून ग्रामपंचायतीमार्फत एक पैठणी साडी लग्नातच भेट दिली जाणार आहे. तिचा विवाह मंचावर गौरवही केला जाणार आहे. गावात लेकींचा जन्मदर वाढावा म्हणून ग्रामपंचायतीतर्फे हा उपक्रम सुरू केल आहे. या उपक्रमाचे परिसरात कौतुक होत आहे.
मुलींसोबत संपूर्ण गाव
आपण स्वतः महिला असल्यामुळे मुलींसाठी काहीतरी करावे या हेतूने ग्रामपंचायतीसमोर हा विषय ठेवला. आणि सर्वांनी या उपक्रमाचे स्वागत केले. एफ.डी. केलेली रक्कम मुलींना उच्च शिक्षणासाठी किंवा विवाहसाठी कामी येईल. यामुळे निश्चितच मुलगा मुलगी हा भेद कमी होण्यासही मदत होईल. शिवाय सासरी जाणाऱ्या प्रत्येक नववधूला संपूर्ण गावातर्फे माहेरची साडी दिली जाणार असल्याने संपूर्ण गाव आपल्या सोबत असल्याची भावना तिच्या मनात निर्माण होईल.
- सुमन म्हस्के, सरपंच, टेंभुर्णी.
मुलीच्या जन्माचे स्वागत होईल
आधुनिक युगात जगात समाजात मुलगा-मुलगी हा भेद कायम आहे. ग्रामपंचायतीच्या अशा उपक्रमामुळे निश्चितच गावात मुलीच्या जन्माचे स्वागत होईल. जर गावात सन्मान झाला तर प्रत्येक घरात लेकीचा सन्मान झाल्याशिवाय राहणार नाही. टेंभुर्णी ग्रामपंचायतीने सुरू केलेला सन्मान लेकीचा हा उपक्रम खरोखरच स्तुत्य आहे.
- आशा खांडेभराड, गृहिणी, टेंभुर्णी.