माहेश्वरी वधू-वर परिचय मेळाव्यास प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 12:40 AM2018-12-03T00:40:49+5:302018-12-03T00:40:55+5:30
माहेश्वरी विवाह समितीच्या वतीने जालन्यात रविवारी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील माहेश्वरी विवाह समितीच्या वतीने जालन्यात रविवारी वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास मोठा प्रतिसाद मिळाला असून, जवळपास ५३५ जणांनी येथे हजेरी लावून एकमेकांचा परिचय करून घेऊन विवाह संदर्भातील सर्व आवश्यक ती माहिती जाणून घेतली. या विवाह सोहळ्यासाठी एक लाख चौरस फुटांचा भव्य मंडप उभारण्यात आला होता.
या मेळाव्यात सहभागी नोंदणी केलेल्यांनी आज येथे उपस्थिती होती. सकाळपासून या मंडपात वधू-वर तसेच त्यांच्या पालकांची लक्षणीय उपस्थिती होती. वधू-वरांसाठी वेगळे दालन करण्यात आले होते. त्यात वैद्यकीय, खाजगी तसेच व्यवसाय, उद्योग करणाऱ्यासाठीच्या दलनांचा समावेश होता. याचे परिचय संमेलनाचे उद्घाटन माहेश्वरी समाजाच्या ज्येष्ठ पदाधिकारी विमला साबू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ब्रिजमोहन तोष्णीवाल, अॅड. चिरंजीव दागडिया, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा माहेश्वरी समाजाचे ज्येष्ठ पदाधिकारी सुरेशकुमार जेथलिया आदींसह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती.
प्रारंभी विवाह समितीचे अध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल राठी यांनी प्रास्ताविकातून या संमेलनाचे महत्व आणि गरज पटवून दिली. या परिचय संमेलनामुळे
अनेकांचे संसार उभे राहिल्याचे मोठे समाधान आम्हा संयोजन समितीला असल्याचे राठी यांनी यावेळी सांगितले.अशा प्रकारचे संमेलन ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी संयोजन समितीचे स्वागताध्यक्ष राजेश सोनी यांनी आलेल्या सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
एक लाख चौरस फूट मंडपात प्रारंभी नोंदणी केंद्र तसेच वधू-वर आणि त्यांच्या पालकांना आपसात एकमेकांशी संवाद साधता यावा म्हणून मंडपात स्वतंत्र व्यवस्था केली होती. यावेळी भोजन व्यवस्थेसह स्मरणिकाही देण्यात येत होती. बाहेर गावाहून आलेल्या प्रमुख पाहुण्यांचे तसेच वधू-वर आणि त्यांच्या पाल्यांचे स्वागत करताना येथील विवाह संयोजन समितीचे सदस्य कुठेच कमी पडले नसल्याचे दिसून आले.