अर्थसंकल्पावरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:57 AM2021-02-05T07:57:58+5:302021-02-05T07:57:58+5:30
मध्यम वर्गाची निराशा सोमवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये करांच्या स्लॅबमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. तसेच डिझेल व पेट्रोलवर अधिभार ...
मध्यम वर्गाची निराशा
सोमवारी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पामध्ये करांच्या स्लॅबमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल केलेला नाही. तसेच डिझेल व पेट्रोलवर अधिभार लावण्यात येणार असल्याने त्याचा परिणाम भाववाढीवर होईल आणि सामान्य माणूसच यात भरडला जाणार आहे. एकीकडे आत्मनिर्भर भारताची घोषणा करतानाच, परदेशी गुंतवणूक वाढीलाही प्रोत्साहन दिले जात आहे. हे दोन्ही कसे शक्य होणार, हा सरकारसमोरील मोठा प्रश्न आहे. एलआयसीचे खासगीकरण हा चुकीचा निर्णय ठरू शकतो.
- प्रा. डॉ. आर. के. राऊत, संत रामदास महाविद्यालय, घनसावंगी.
..............
आरोग्यासाठी ऐतिहासिक तरतूद
या अर्थसंकल्पामध्ये कोरोना लसीकरणासह आरोग्य क्षेत्राच्या विविध योजनांसाठी केलेली तरतूद निश्चितच प्रेरणा देणारी आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विचार करून अर्थसंकल्पात कृषीसाठी भरीव तरतूद केली असून, ती जवळपास १६.५ लाख कोटी रुपयांची आहे. पायाभूत सुविधांसाठी ४० हजार कोटी रुपये ठेवण्यात आले आहेत. तरुणांसाठी एप्रेंटशिप योजना महत्त्वाची आहे. ग्रामीण पेयजल योजनेसाठी २८७ लाख कोटींची तरतूद लक्षणीय म्हणावी लागेल.
- प्राचार्य डॉ. विश्वास कदम, मॉडेल कॉलेज, घनसावंगी
...................
अर्थसंकल्प निराशाजनक
अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांनी सादर केलेले बजेट केवळ घोषणांची जंत्री असून, कुठल्याही वर्गाला पूर्ण क्षमतेने आनंददायी नाही. प्रत्येक विषयाला हात घालून आम्ही भरपूर काही केले, असे भासविण्याचा केंद्र सरकारचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. त्यामुळे हे बजेट म्हणजे केवळ निराशाजनकच म्हणावे लागेल.
- प्रा. डॉ. सुनील मेढे, जापराबाद
..........
एक देश, एक रेशनकार्ड उपक्रम चांगला
आजच्या बजेटमध्ये अर्थमंत्र्यांनी ‘एक देश, एक रेशनकार्ड’ ही घोषणा केली असून, ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना वेगवेगळ्या योजनेतून बरेच काही देण्याचा प्रयत्न चांगला आहे. पगारदार आणि करदात्यांसाठी मात्र कुठलेच बदल न केल्याने त्यांच्यात नाराजीचा सूर कायम आहे.
- प्रा. बाजी सहदेवन, जालना
...................
पायाभूत सुविधांसाठीची तरतूद लक्षणीय
सोमवारी जाहीर झालेल्या अर्थसंकल्पात करदात्यांसाठी कुठलाही दिलासा नाही, तसेच महाराष्ट्रासाठी कुठलीही तरतूद नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या अर्थसंकल्पात पायाभूत सुविधा, बँकिंग क्षेत्र यासाठी केलेली तरतूद चांगली असून, यामुळे उद्योग जगतात समाधान व्यक्त होत आहे. अर्थसंकल्पानंतर शेअर बाजार जवळपास २,८०० अंकांनी वाढल्याने अर्थसंकल्पाचे एकप्रकारे स्वागतच करावे लागेल.
- प्रा. एस. व्ही. देशपांडे, अर्थतज्ज्ञ, जालना
...............
अंमलबजावणीचे सरकारसमोर आव्हान
या अर्थसंकल्पामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण व आरोग्य सुविधांच्या बळकटीकरणासाठी मोठी तरतूद करण्यात आली आहे. ही तरतूद कागदावरच राहू नये, तर ती प्रत्यक्षात आणून गरिबांसाठी नि:शुल्क मिळायला हवी. या अर्थसंकल्पात शेती विकासावर अधिकचा भर देणे गरजेचे होते, परंतु तसे झालेले नाही. प्रत्यक्षात शेतीच्या पायाभूत सुविधा म्हणजेच सिंचन, ऊर्जा यासाठीची तरतूद अपुरी आहे. शेतमालाला उत्पादन खर्चाच्या दीडपट हमीभावाचे दिलेले आश्वासन प्रत्यक्षात आणणे सरकारसमोर आव्हान ठरणार आहे.
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री
............
भांडवलदारांसाठीचा अर्थसंकल्प
अर्थसंकल्पामध्ये निर्मला सीतारमन यांनी आगामी पाच राज्यांत होऊ घातलेल्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून, त्या राज्यांमध्ये रस्ते व अन्य प्रकल्पांसाठी मोठी तरतूद करून तेथील नागरिकांचे लक्ष वेधले आहे. परंतु, महाराष्ट्रासह अन्य राज्यांना या अर्थसंकल्पात ठेंगा दाखवला आहे. आरोग्यासाठीची तरतूद आणखी वाढवून हवी हाेती. या अर्थसंकल्पात खासगीकरणाच्या दिशेने सरकार चालले असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे हे सरकार शेतकरी आणि जनसामान्यांचे नसून, ते भांडवलदारांचे आहे, हे स्पष्ट होते.
-अर्जुन खोतकर, माजी मंत्री
................
आरोग्यासाठीच्या योजनांचे स्वागत
बजेटमध्ये आरोग्य क्षेत्रासाठी ज्या पद्धतीने तरतुदी केल्या आहेत, त्यांचे स्वागत केले पाहिजे. त्यातून सर्वसामान्यांना मोठा दिलासा एक-दोन वर्षात मिळणार आहे. कोरोनानंतर सरकार आरोग्याबाबत जागरूक झाल्याने, त्याचे सर्वसामान्यांमधून स्वागत होत आहे. या केलेल्या तरतुदींची अंमलबजावणी महत्त्वाची ठरणार आहे.
- डॉ. क्रांतीसिंह लाखे पाटील, जालना
................
तोंडाला पाने पुसली
केंद्र सरकारने वाढत्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीकडे दुर्लक्ष केल्याने गरिबांच्या जखमेवर मीठ चोळण्यासारखे आहे. त्यामुळे महागाईमध्ये आणखी वाढ होऊन, सामान्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार आहे. या बजेटचा जेवढा चांगला म्हणून उल्लेख केला जात आहे, त्यात तथ्य नसून, कुठल्याही योजनेसाठी भरीव तरतूद नसून, सर्व योजनांना थोडीबहुत तरतूद करून आम्ही सर्व आघाड्यांवर कसे यशस्वी ठरलो, याचाच गवगवा केंद्राकडून केला जात आहे. एकूणच हा अर्थसंकल्प म्हणजे तोंडाला पाने पुसणारा म्हणावा लागेल.
- आमदार कैलास गोरंट्याल
...........
करावे तेवढे कौतुक कमीच
केंद्रीय अर्थमंत्री सीतारमन यांनी आरोग्य, आत्मनिर्भर भारत, पर्यावरण रक्षणासाठी जाहीर केलेली योजना तसेच शेतीसाठी स्वतंत्र निधी निर्माण करणे, पशूसंवर्धनासाठीही अशीच तरतूद करणे, ‘एक जिल्हा एक प्रोजेक्ट’ या योजनेतून शेतकऱ्यांच्या उत्पादनाला हक्काची बाजारपेठ मिळवून देणे, पीक कर्जात वाढ करणे, युवकांसाठी रोजगार, रेल्वेसाठीची भरीव तरतूद यासह लसीकरणाला दिलेले महत्त्व, डिजिटल व्यवहार, मेड इन इंडिया या सर्व बाबींना स्पर्श करून हा अर्थसंकल्प जनतेसाठी मांडला आहे. त्यामुळे या अर्थसंकल्पाचे करावे तेवढे कौतुक कमी आहे.
रावसाहेब दानवे, केंद्रीय राज्यमंत्री
..................