रिक्षातून विद्यार्थी वाहतुकीवर निर्बंध..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2018 12:45 AM2018-07-29T00:45:56+5:302018-07-29T00:46:34+5:30
शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शोभा प्रकाश मंगल कार्यालयात शहरातील मुख्याध्यापकांची बैठक पार पडली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहर वाहतूक शाखा आणि उपप्रादेशिक कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी शोभा प्रकाश मंगल कार्यालयात शहरातील मुख्याध्यापकांची बैठक पार पडली.
या बैठकीत उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार केवळ १२ सीट वाहून नेण्याची परवानगी असणाऱ्या वाहनांमधून शालेय वाहतूक करावी असा निर्णय घेण्यात येऊन, रिक्षा चालकांनी पुढील १५ दिवसात नवीन किंवा भाडेतत्वावर १२ सीट बसणाºया वाहनांची व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले. यावेळी उपप्रादेशिक अधिकारी संजय मेत्रेवार, एआरटीओ विजय काळे, सोनाली पोदार, हेरकर, परमेश्वर काटकर, चौधरी, पाटील यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या सुरूवातीला शहर वाहतूक शाखेचे निरीक्षक चत्रभुज काकडे यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी एक मास्टर प्लान तयार केल्याचे सांगितले. तसेच त्याची अंमलबजावणी लवकरच जिल्हाधिका-यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार असल्याचेही काकडे यांनी सांगितले.
यावेळी मेत्रेवार यांनी सांगितले की, आता यापुढे प्रत्येक शाळेत शहर वाहतूक सुरक्षा समितीची स्थापना करण्यात यावी, त्यात मुख्याध्यापक, पालकांचा एक प्रतिनिधी आणि एक वाहनधारकांचा प्रतिनिधी यात राहणार आहे.
जेवढे सीट वाहून नेण्याचा परवाना त्या वाहनाला आहे, त्यापेक्षा जास्त प्रवासी, विद्यार्थी न बसविण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. यावेळी शहरातील मुख्याध्यपकांनी देखील त्यांना येणा-या अडचणी मांडल्या. दरम्यान विकास काळे यांनी यावेळी सांगितले की, जेथून बस अथवा अन्य गाडी विद्यार्थ्यांना घेऊन निघेल त्यांची स्वतंत्र यादी ही वाहन चालकांकडे असल्यास त्याचा मोठा लाभ होणार असल्याचे ते म्हणाले.