उन्हाच्या काहिलीने श्रींच्या दर्शनाच्या गर्दीवर परिणाम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2019 12:51 AM2019-05-23T00:51:52+5:302019-05-23T00:52:08+5:30
वाढत्या तापमानाचा बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर परिणाम दिसून आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : अलिकडे वाढत्या तापमानाचा बुधवारी संकष्टी चतुर्थीनिमित्त राजुरेश्वराच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या गर्दीवर परिणाम दिसून आला.
गेल्या चार दिवसांपासून राजूरसह परिसरात सूर्य आग ओकत आहे. तापमानाने बेचाळिशी पार केली आहे. त्यातच राजूर ऊंच टेकडीवर असून जिरायत पट्ट्यात मोडणारा भाग असल्याने उन्हाची तीव्रता अधिक जाणवते. दरमहा येणा-या संकष्टी चतुर्थीला आसपासच्या जिल्ह्यासह परिसरातून भाविक मोठ्या संख्येने राजूरेश्वराच्या दर्शनासाठी गर्दी करतात. तसेच पंचक्रोशीतून महिला मंडळांसह पुरूष भाविकांच्या पायी दिंड्या मोठ्या प्रामाणात येतात.
परंतु, उन्हाच्या काहिलीने पायी येणा-या दिंड्यांवर मोठा परिणाम दिसून आला.
आज तुरळक पायी दिंड्या राजुरात दाखल झाल्या होत्या. वाढत्या उन्हामुळे चिमुकल्यांसह आबालवृध्द भाविक कमी दिसले. भाविकांच्या कमी गर्दीचा फटका व्यापाऱ्यांना बसला. नारळ, प्रसाद, खेळण्यांची दुकाने, हॉटेल, फळविक्रेत्यांचे व्यवसाय डबघाईस आले होते. वाढत्या तापमानामुळे खबरदारीचा उपाय म्हणून गणपती संस्थानने मंदिर परिसरात सावलीसाठी मंडप उभारला होता. तसेच संस्थानसह अन्य दानशूर भाविकांनी पिण्याच्या पाण्याची मोफत सोय केली होती.