परतीच्या पावसाचे तांडव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2019 01:05 AM2019-10-24T01:05:41+5:302019-10-24T01:06:21+5:30

बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४८.७५ मिमी पाऊस झाला असून, ११ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली.

The return ebb | परतीच्या पावसाचे तांडव

परतीच्या पावसाचे तांडव

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना / भोकरदन : बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी ४८.७५ मिमी पाऊस झाला असून, ११ महसूल मंडळात अतिवृष्टी झाली. दरम्यान, या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मात्र, मोठा फटका बसला आहे. भोकरदन तालुक्यातील बेलोरा येथील कोल्हापुरी बंधाऱ्याची एक बाजू पाण्यामुळे वाहून गेली आहे. तर जालना शहराला पाणीपुरवठा करणाºया घाणेवाडी प्रकल्पात ६ फुटांपेक्षा अधिक पाणीसाठा झाला.
जिल्ह्यात गत आठवड्यापासून परतीच्या पावसाने दमदार हजेरी लावली आहे. भोकरदन तालुक्यातील केळना, पूर्णा, गिरजा, रायघोळ, धामणा, जुई या सर्व नद्यांना पूर आला होता. तर बेलोरा येथील बंधा-याला सिंचन विभागाने गेट टाकलेले आहेत. त्यात पाण्याचा प्रवाह जास्त असल्यामुळे हा बंधारा एका बाजूने वाहून गेला. त्यामुळे येथील शेतकरी दशरथ श्रीपत कोल्हे यांचे अर्धा एकर शेती वाहून गेली. तसेच गजानन सुखदेव कोल्हे, पंजाब सारंगधर बदर, रमेश शिंदे या तीन शेतकऱ्यांच्या बंधा-याच्या लगत नदीच्या काठावर असलेल्या विहिरी गाळामुळे गायब झाल्या आहेत. त्यामुळे शेतकºयांचे १२ ते १५ लाख रूपयाचे नुकसान झाले. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे. दरम्यान, या पावसामुळे मका, सोयाबीन, कपाशी या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
अभियंत्यांनी केली पाहणी
बेलोरा बंधारा वाहून गेल्याची माहिती जलसंधारण विभागाचे उपअभियंता आऱ के़जाधव, अंबादास सहाने यांना देण्यात आली. माहिती मिळताच त्यांनी तात्काळ बेलोरा येथे जाऊन पाहणी केली.
या मंडळांत झाली अतिवृष्टी
जालना तालुक्यातील रामनगर महसूल मंडळात ८४ मिमी, विरेगाव ९४ मिमी, पचनवडगाव ६५ मिमी, वाघ्रूळ जहागीर ११० मिमी, बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी ८० मिमी, भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार ९५ मिमी, राजूर ७९ मिमी, केदारखेडा ८१ मिमी, अनवा १३० मिमी, परतूर महसूल मंडळात ७८ मिमी तर अंबड, वडीगोद्री महसूल मंडळात ९८ मिमी पाऊस झाला.
‘खडकपूर्णा’तून ५८ हजार क्युसेसचा विसर्ग
तळणी : विदर्भातील खडकपूर्णा प्रकल्पाचे १९ दरवाजे बुधवारी सायंकाळी उघडण्यात आले असून, पूर्णा नदीपात्रात ५८ हजार ३१३ क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरु आहे. पाण्याची आवक वाढल्याने मंठा तालुक्यातील पूर्णा नदीवरील पूर्णा पाटी, वझर सरकटे व उस्वद येथील कोल्हापुरी बंधा-यावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे बंधा-याच्या बाजूचा भराव वाहून जाण्याबरोबर शेतात पाणी घुसून शेतजमीन व पिकांचे मोठे नुकसान होत आहे. तिन्ही बंधा-यांची पाटबंधारे व मंठा तहसीलच्या अधिकारी व कर्मचाºयांनी पाहणी केल्याचे उस्वद येथील माजी सरपंच राम चट्टे, वामन देशमुख, संतोष सरकटे, अशोक सरकटे यांनी सांगितले.
जामवाडीनजीकच्या पुलाचा सापळा गेला वाहून
जालना शहरापासून जवळच असलेल्या जामवाडी गावाजवळील हॉटेल युवराज जवळ नव्यानेच एक पूल बांधण्यात येत आहे. बुधवारी झालेल्या जोरदार पावसामुळे या पुलाचा सापळा वाहून गेला. ही घटना सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास घडली. यामुळे जालना ते देऊळगावराजा या दरम्यानची वाहतूक ठप्प झाली होती. ही वाहतूक नंतर सिंदखेड राजा आणि भोकरदन मार्गे वळविण्यात आली. पूल वाहून गेल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रशांत वाडेकर यांनी जिल्हा प्रशासनाला कळविली. त्यानंतर खबरदारी घेण्यात आली.
जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांकडून पाहणी : बंधा-यावरील २० गेट काढले
केदारखेडा : येथील पूर्णा नदीवरील कोल्हापुरी बंधारा मंगळवारी मध्यरात्री ओव्हरफ्लो झाला. पाण्याचा वेग वाढल्याने बंधा-याचे पाणी शेजारील शेतशिवारात गेले. त्यामुळे या भागातील शेतक-यांचे मोठे नुकसान झाले. बंधा-याच्या पाण्याची धार नदीकाठावरील पंढरीनाथ तांबडे यांच्या शेतातून पडल्याने कपाशीसह जमिनीतील माती वाहून गेली.
याची दखल घेत जलसंधारण खात्याच्या अधिका-यांनी मंगळवारी दुपारी केदारखेडा कोल्हापुरी बंधा-याचे २० गेट काढले होते. बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी या बंधा-याची पाहणी केली. यावेळी जलसंधारणचे उपविभागीय अधिकारी आर.के.जाधव, अंबादास सहाने आदींची उपस्थिती होती.

Web Title: The return ebb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.