सावकारी पाश सैल; तीन शेतकऱ्यांची जमीन परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 01:37 AM2020-02-19T01:37:55+5:302020-02-19T01:38:50+5:30

सावकारकीतून केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द ठरवून संबंधित शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचे आदेश जालना येथील सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिले.

The return of the land of three farmers | सावकारी पाश सैल; तीन शेतकऱ्यांची जमीन परत

सावकारी पाश सैल; तीन शेतकऱ्यांची जमीन परत

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : सावकारकीतून केलेले जमिनीचे खरेदीखत रद्द ठरवून संबंधित शेतकऱ्यांना जमिनी परत करण्याचे आदेश जालना येथील सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी दिले. या प्रकरणात तीन शेतक-यांना ७ एकर ३९ आर जमीन परत मिळाली आहे.
भाऊसाहेब शेषराव पवार (कर्जत ता. अंबड) यांनी शेतीच्या कामासाठी सावकारी व्यवहारातून ५० हजार रूपये घेतले होते. या व्यवहारात संबंधित शेतक-याने ५ एकर ३ गुंठे जमीन बाबूराव म्हसू नरोटे व कुटुंबाला खरेदीखत करून दिले होते. मात्र, व्याजासह पैसे परत देऊनही जमीन परत मिळत नव्हती. पंढरीनाथ रायभान सरोदे (रा. सरफगव्हाण ता. घनसावंगी) यांनी शेषराव बोरगे याच्याकडून सावकारी व्यवहारातून घेतल्या पैशापोटी एक एकर जमीन खरेदीखत करून दिली होती. पैशाची परतफेड करूनही जमीन परत मिळत नव्हती. या प्रकरणात पंढरीनाथ सरोदे यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी सीताबाई सरोदे यांनी डीडीआर यांच्याकडे दावा दाखल केला होता. तर उत्तमराव खराबे (रा. हेलस ता. मंठा) यांनी गावातील पुंजाराम आश्रोबा खराबे याच्याकडून सावकारी व्यवहारातून घेतलेल्या पैशापोटी ७६ आर जमीन लिहून दिली होती. पैशांची परतफेड करूनही जमीन मिळत नव्हती. उत्तमराव खराबे यांच्या निधनानंतर त्यांचा मुलगा महादेव खराबे यांनी २०१८ मध्ये सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, जालना यांच्याकडे दावा दाखल केला होता.
या तिन्ही प्रकरणात शेतक-यांच्या बाजूने अ‍ॅड. दशरथ शिराळे यांनी बाजू मांडली. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, साक्ष व अ‍ॅड. शिराळे यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून सावकाराचे जिल्हा उपनिबंधक चव्हाण यांनी सोमवारी, या तिन्ही शेतक-यांच्या शेतीचे सावकारीतून झालेले खरेदीखत रद्द करून जमिनी शेतक-यांना परत केल्या.

Web Title: The return of the land of three farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.