परतीच्या पावसाचा जालनेकरांना तडाखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 12:44 AM2019-10-08T00:44:21+5:302019-10-08T00:44:44+5:30
जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्ह्यात गत दोन दिवसांपासून विजांच्या कडकडाटासह परतीच्या पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर कमी असला तरी गत दोन दिवसांत वीज पडल्याने सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात ५.८६ मिमी पाऊस झाला.
सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंत जालना महसूल मंडळात १० मिमी, जालना ग्रामीण ६ मिमी, रामनगर, विरेगाव, पाचन वडगावमध्ये २ मिमी, तर सेवली ४ मिमी व वाघ्रूळ जहागीर मंडळात ६ मिमी पावसाची नोंद झाली.
बदनापूर तालुक्यातील बावणे पांगरी महसूल मंडळात ४० तर दाभाडी मंडळात ६ मिमी पाऊस झाला. भोकरदन मध्ये २ मिमी, धावडा २३ मिमी, पिंपळगाव रेणुकाई ५ मिमी, हसनाबाद २ मिमी, राजूर ५ मिमी तर केदारखेडा शिवारात ७ मिमी पाऊस झाला आहे. परतूर महसूल मंडळात १५.८० मिमी पाऊस झाला. मंठा, ढोकसल ५ मिमी तर पांगरी गोसावीत ८ मिमी पाऊस झाला. अंबड २ मिमी, धनगर पिंपरी ७ मिमी, जामखेड २६ मिमी, वडीगोद्री १५ मिमी, गोंदी ७ मिमी, रोहिलागड २२ मिमी पाऊस झाला. घनसावंगीत ७ मिमी, रांजणी १५ मिमी, तीर्थपुरी, कुंभार पिंपळगाव ५ मिमी, अंतरवली टेम्बी २३ मिमी तर जांभ समर्थ येथे ५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले.
१७ मंडळे कोरडी
जिल्ह्यातील ३९ पैकी १७ महसूल मंडळांत पाऊस झाला नाही. यात बदनापूर तालुक्यातील बदनापूर, रोषणगाव, सेलगाव, भोकरदन तालुक्यातील सिपोरा बाजार, अन्वा, जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद, टेंभुर्णी, कुंभारझरी, वरूड, माहोरा, परतूर तालुक्यात सातोना, आष्टी, श्रीष्टी, वाटूर, मंठा तालुक्यातील तळणी, अंबड तालुक्यातील सुखापुरी तर घनसावंगी तालुक्यातील राणी उंचेगाव महसूल मंडळात पाऊस झाला नाही.
रामनगर : वीज पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू
रामनगर : जालना तालुक्यातील दहिफळ (काळे) या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये इयत्ता दुसरीत शिकत असलेला महेश गणेश राऊत (९) दुपारी ३ वाजता शाळा सुटल्यानंतर खेळण्यासाठी बाहेर आला. शाळेच्या पाठीमागच्या बाजूला असलेल्या जुना टॉवरजवळ तो खेळत असताना अचानक वीज अंगावर पडली आणि त्यामुळे त्याचा मृत्यू झाला. घटनेबद्दल हळहळ व्यक्त होत आहे.
दानापूर शिवारात लिंबाच्या झाडावर पडली वीज
दानापूर : भोकरदन तालुक्यातील दानापूर शिवारात मनसुबराव औचितराव पवार यांच्या वखारीवर लिंबाचे झाड आहे. या झाडावर सोमवारी दुपारी वीज पडल्याने झाड जळाले. पाऊस सुरू झाल्याने मनसुबराव पवार, चंद्रकला पवार, ज्ञानेश्वर पवार, दत्ता पवार, सोनू पवार, संदीप पवार, रामेश्वर पवार यांनी वखारीवर प्रवेश केला.
तर दत्ता पवार हा पाणी पिण्यासाठी लिंबाच्या झाडा जवळील हौदावर गेला होता.तो पाणी पिऊन परत आला. त्यानंतर काही क्षणातच लिंबाच्या झाडावरती वीज पडली. वेळेवर वखारीवर गेल्याने आम्ही बचावल्याचे मनसुबराव पवार यांनी सांगितले. दरम्यान, पडसखेडा मुर्तड येथेही पावसामुळे कपाशी, मका, मिरची इ. पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सुभेदार चौधरी, विश्वनाथ वरपे यांनी सांगितले.