जिल्हाभरात परतीच्या पावसाने आशा पल्लवित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 12:58 AM2019-09-26T00:58:31+5:302019-09-26T00:58:55+5:30
बुधवारी दिवसभरात परतूरसह भोकरदन व परिसरात पावसाने हजेरी लावली
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना/ परतूर : जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात ७.५२ मिमी पाऊस झाला. परतूर तालुक्यात सर्वाधिक ३७.९६ मिमी पावसाची नोंद झाली. बुधवारी दिवसभरात परतूरसह भोकरदन व परिसरात पावसाने हजेरी लावली. जालना शहरासह परिसरात रिमझिम पाऊस झाला.
गत काही दिवसांपासून जिल्ह्याच्या विविध भागांत पावसाने हजेरी लावली आहे. परतूर तालुक्यात सलग तिसऱ्या बुधवारी दिवशी पावसाने हजेरी लावली. दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास शहरासह परिसरात जोरदार पाऊस झाला. बुधवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात तालुक्यात ३७.९६ मिमी पाऊस झाला. यात परतूर महसूल मंडळात १९.८० मिमी, सातोना महसूल मंडळात ५२ मिमी, आष्टी- ४९ मिमी, श्रीष्टी ३३ मिमी तर वाटूर परिसरात ३६ मिमी पाऊस झाला. परतूर तालुक्यात वार्षिक सरासरीच्या ४९५.६९ मीमी पाऊस झाला आहे. या पावसाने जलसाठ्यात वाढ होण्यास मदत झाली आहे. मात्र, आष्टी, सातोना शिवारातील पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
जिल्ह्यातील ४९ महसूल मंडळापैकी २६ महसूल मंडळांत पावसाने हजेरी लावली. यात भोकरदन तालुक्यातील पिंपळगाव रेणुकाई- ११ मिमी, राजूर ४ मिमी, आन्वा ४ मिमी पाऊस झाला. जाफराबाद तालुक्यातील जाफराबाद ५ मिमी, टेंभुर्णी १२ मिमी, कुंभारझरी ९ मिमी, वरूड ६ मिमी, माहोरा ३ मिमी, परतूर १९.८० मिमी, सातोना ५२ मिमी, आष्टी- ४९ मिमी, श्रीष्टी ३३ मिमी तर वाटूर परिसरात ३६ मिमी पाऊस झाला.
मंठा ५ मिमी, ढोकसाल ६ मिमी, पांगरी गोसावी ३ मिमी, अंबड, धनगरपिंपरी प्रत्येकी ३ मिमी, गोंदी ५ मिमी, घनसावंगी १४ मिमी, राणी उंचेगाव ७ मिमी, रांजणी ३ मिमी, तीर्थपुरी ५ मिमी, कुंभारपिंपळगाव ७ मिमी, अंतरवली टेंब्री ११ मिमी तर जांभ समर्थ महसूल मंडळात ७ मिमी पाऊस झाला.
आष्टी येथे मंगळवारी सायंकाळी, बुधवारी दुपारी जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे ओढ्या- नाल्यांना प्रथमच पाणी आले. आष्टीमध्ये मोंढा ते बसस्थानक या मुख्य रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला होता. सततच्या पावसामुळे कापूस, सोयाबीनच्या पिकाचे नुकसान झाले.