महसूल विभागाची धडक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2018 12:28 AM2018-06-17T00:28:01+5:302018-06-17T00:28:01+5:30
शनिवारी महसूल पथकाने सकाळी गंधारी येथील गोदापात्रात धडक कारवाई करत अवैध वाळूउपसा करत असलेले तीन पोकलेन आणि एक हायवा टिप्पर जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
अंबड : तालुक्यातील गोदाकाठी वाळू माफियांच्या अवैध वाळूउपसा व तस्करी संदर्भात शनिवारी लोकमतने वृत्त प्रकाशित करताच महसूल प्रशासन खडबडून जागे झाले. शनिवारी महसूल पथकाने सकाळी गंधारी येथील गोदापात्रात धडक कारवाई करत अवैध वाळूउपसा करत असलेले तीन पोकलेन आणि एक हायवा टिप्पर जप्त केले.
या कारवाईमुळे वाळू माफियांत खळबळ उडाली. मात्र, शनिवारी वाळू माफियांविरोधात करण्यात आलेल्या कारवाईमध्ये नेहमीप्रमाणे महसूल व पोलीस यंत्रणेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याची बाब पुन्हा एकदा प्रकर्षाने समोर आली.
सकाळी अंबडचे तहसीलदार दत्तात्रय भारस्कर यांच्या आदेशाने महसूल विभागाचे नायब तहसीलदार संदीप ढाकणे, शहागड महसूल मंडळ अधिकारी पी. डी. शिंदे, तलाठी श्रीपाद देशपांडे, ए. ए. देशमुख, एस. पी. घनघाव, पी. एन. गजरे, के. डी. मुजगूले, कोतवाल अशोक शिंदे, संदीप धारे, शाम विभुते, विकी केदार, योगेश कुरेवाड आदींच्या पथकाने गंधारी येथील वाळूघाट गाठला.
यावेळी सदरील वाळूघाटात अनेक यंत्रांच्या मदतीने बेकायदेशीरपणे उपसा सुरु असल्याचे आढळले. या पथकाला पाहताच वाळू घाटातील दुसऱ्या बाजूच्या वाळू तस्करांनी आपाआपली वाहने, पोकलेन, जेसीबी, यांत्रिक बोटी, केनी यंत्र घेऊन पळ काढला.
गंधारी येथे जप्त करण्यात आलेली यंत्रसामुग्री व हायवा टिप्पर महसूल पथकाने गोंदी पोलिसांच्या ताब्यात दिले.
यानंतर पथकाने कुरण, हसनापूर, इंदलगाव, गोंदी इ. गावांच्या गोदाकाठाची पाहणी केली.
वाळू माफियांविरोधातील मोहीम यापुढेही अशाच पद्धतीने सुरु राहणार आहे. अवैध उपसा व वाहतूक करणाºयांची कदापिही गय केली जाणार नाही, अवैध वाळू तस्करी करणाºयांवर कठोर कायदेशीर कारवाई करणार असल्याचे तहसीलदार दत्तात्रय भारस्कर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.
महसूल विभागाचे पथक गोदापात्रात उतरल्याची बातमी वाºयासारखी वाळू माफियांपर्यंत पसरली. बातमी पसरताच इतर ठिकाणच्या वाळू तस्करांनी साहित्य घेऊन पोबारा करण्यातच धन्यता मानली.
औरंगाबाद, जालना व बीड येथून येणाºया हायवा, टिप्पर इ. वाहनांना कारवाईची माहिती मिळताच सुरक्षित ठिकाणी आश्रय घेतला. महसूल पथक इतर ठिकाणी धाडी टाकण्याच्या तयारीत असल्याची वाळू तस्करांपर्यंत माहिती पोहोचली, त्यामुळे शनिवारी वाळू तस्करांनी गोदापात्राकडे जाण्याचे धाडस केले नाही.