आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 01:06 AM2018-06-22T01:06:28+5:302018-06-22T01:06:28+5:30

Revenue department's farce of action against sand mafias | आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी...!

आग सोमेश्वरी, बंब रामेश्वरी...!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
केदारखेडा : परिसरात दिवसभर वाळूचा उपसा सुरु असताना उपसा एकीकडे आणि तहसीलदारासह महसूल विभागाच्या पथकाची कारवाई दुसरीकडे सुरु होती़ या पथकाने रिकाम्या उभ्या असलेल्या गाड्यांचा पंचनामा केला़ तहसीलच्या पथकाने केवळ देखावा करत रिकाम्या गाड्यांवर कारवाईचा फार्स केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
पूर्णा नदीपात्रातून दिवसाढवळ्या वाळू उपसा करण्यात येत असल्याने याबाबत मंगळवारी लोकमतने वृत्त प्रकाशीत केले होते. यामुळे तहसीलदार योगिता कोल्हे यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली खरी, मात्र ज्या भागात वाळू उपसा सुरु आहे तो परिसरात सोडून दुसरीकडेच कारवाई केली आहे. वाळू माफिया व महसूल आणि पोलिसांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे हा वाळूचा उपसा जोरात सुरू असल्याचे बोलले जात आहे. भोकरदन येथे तहसीलदार योगिता कोल्हे रुजू होताच वाळू माफियांमध्ये घबराट निर्माण झाली होती़ अनेक ठिकाणी त्यांनी अवैध वाळू उपशाच्या विरोधात धडाकेबाज कारवाई करून स्वत:ची ओळख निर्माण केली होती. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या कारवाया अचानक थंडावल्या आहेत. त्यामुळे महसूल खाते भर दिवसा सुरु असलेल्या वाळू उपशाकडे कानाडोळा करीत आहे़ ही यंत्रणा मूग गिळून गप्प का, असा सवालही सर्वसामान्यांतून होत आहे़ वरिष्ठांनी लक्ष देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
नुसताच गाजावाजा : कारवाईच्या वेळी बघ्यांची गर्दी
बुधवारी सायंकाळी तहसीलदार योगिता कोल्हे आणि त्यांच्या पथकाने कारवाईचा मोठा देखावा करत रिकाम्या उभ्या असलेल्या हायवा गाड्यांचा पंचनामा केला़ हा पंचनामा सुरु असताना तहसीलदारांची कारवाई सुरु असल्याने बघ्यांनी मोठी गर्दी केली होती़ मात्र कारवाई सुरु असलेल्या हायवा ट्रकमध्ये वाळू नसल्याचे नागरिकांच्या लक्षात आल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले. अशा प्रकारे पोकळ कारवाईमुळे नागरिकही हैराण झाले आहेत. याकडे वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे.

Web Title: Revenue department's farce of action against sand mafias

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.