प्रत्यक्ष नदीपात्रात जाऊन महसूल पथकाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 12:05 AM2019-05-11T00:05:34+5:302019-05-11T00:05:48+5:30
अंबड तालुक्यातील गोंदी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या सात ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदी : अंबड तालुक्यातील गोंदी येथे शुक्रवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास गोदावरी नदीपात्रात जाऊन अवैध वाळू उपसा करणाऱ्या सात ट्रॅक्टर पकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. दरम्यान आठ दिवसापूर्वी महसूलच्या अधिकाऱ्यांनी गोदावरी नदी पात्रातील वाळूचे अवैध साठे जेसीबीच्या मदतीने नदी पात्रात टाकले होते.
ही कारवाई संपल्यानंतर वाळू माफियांनी लगेचच डोके वर काढत नदी पत्रातून अवैध वाळूचा उपसा सुरु केला होता. गोंदी पोलिसांनी शुक्रवारी नदीपात्रात जाऊन सहा ट्रॅक्टरवर कारवाई केली. या कारवाईत सुमारे ३५ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
ही कारवाई गोंदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवानंद देवकर, पो कॉन्स्टेबल अशोक गाढवे, पोहार, पगारे, खांडेकर, आढाव यांच्या पथकाने पार पाडली. पोलीस कॉन्स्टेबल यशवंत मुंडे यांच्या फिर्यादीवरून गौण खनिज कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूणच पोलीस आणि महसूल विभागाने वारंवार कारवाई करूनही वाळू माफिया कुणालाच जुमानत नाहीत. यामुळे वाळू वाहतुकीला चालना मिळत असून, यामुळे वाळुची कृत्रिम टंचाई निर्माण करून नागरिकांकडून जास्तीचे पैसे उकळतात.