अन् महसूलचे पथक रिकाम्या हाताने परतले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:54 AM2021-03-13T04:54:57+5:302021-03-13T04:54:57+5:30
भोकरदन : मेरखेडा शिवारात अवैध वाळूचा उपसा करीत असलेला ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या महसुलाच्या पथकाला परिसरातील शेतकऱ्यांनी अडविले. शासकीय ...
भोकरदन : मेरखेडा शिवारात अवैध वाळूचा उपसा करीत असलेला ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेलेल्या महसुलाच्या पथकाला परिसरातील शेतकऱ्यांनी अडविले. शासकीय वाहनामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले, त्याची भरपाई देण्याचा तगादा शेतकऱ्यांनी लावला. अखेर महसूलच्या पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले. दरम्यान, या संधीचा फायदा घेऊन ट्रॅक्टर पळवून नेण्यात वाळूमाफिया यशस्वी झाले.
भोकरदन तालुक्यातील केदारखेडा, जवखेडा ठोबरी, नांजा, लिंगेवाडी, सिपोरा बाजार, हसनाबाद, देऊळगाव ताड, तांदूळवाडी आदी परिसरातून रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसाचा गोरख धंदा सुरू आहे, त्याला लगाम लावण्यासाठी तहसीलदार संतोष गोरड यांनी पथक स्थापन केले. ११ मार्च रोजी रात्री ७ ते ९ वाजेच्या दरम्यान मेरखेडा परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून एक ट्रॅक्टर अवैध वाळूचा उपसा करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून नायब तहसीलदार के.टी. तांगडे, तलाठी एस.ए. पोहर, सुरेश लेकुरवळे, विठ्ठल मालोदे हे ट्रॅक्टर पकडण्यासाठी गेले. ट्रॅक्टर पुढे व त्याच्या मागे तहसीलची गाडी याच दरम्यान गाडी पुढे घेण्यासाठी शेतातून जात होती. त्यामुळे शेतातील पीक खराब झाले, दरम्यान तांबडे, रोकडे नावाच्या (पूर्ण नाव कळू शकले नाही) शेतकऱ्यांसह काही ग्रामस्थ जमा झाले व आधी भरपाई द्या नंतर गाडी हलवा, असा पवित्रा घेतला. याच संधीचा फायदा घेत माफियांनी ट्रॅक्टर पळवून नेला. अखेर महसूल पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले.