तळेगाव धरणातून अवैध पाणीउपसा; विद्युतपंप जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2018 01:03 AM2018-12-06T01:03:48+5:302018-12-06T01:04:36+5:30
घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील धरणामधील अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्या शेतकºयांचे विद्युत पंप महसूल पथकाने बुधवारी जप्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील तळेगाव येथील धरणामधील अवैधरीत्या पाणी उपसा करणाऱ्या शेतक-यांचे विद्युत पंप महसूल पथकाने बुधवारी जप्त केले.
तळेगाव येथील धरणामध्ये अल्प पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणामध्ये यावर्षीच्या अल्प पावसामुळे पाणीसाठा वाढलेला नाही यामुळे धरणाची पाणीपातळी जेमतेमच राहिला. या धरणामधून मागील काही दिवसापासून अवैधपणे पाणी उपसा सुरु असल्याने धरणाची पाणी पातळी झपाट्याने कमी होत चालली होती. धरणाच्या कमी होत चाललेल्या पाणीपातळीमुळे परिसरा मध्ये पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले आहे. जनावराच्या पाण्याचा प्रश्न बिकट बनला असल्याने शेतक-यामधून चिंता व्यक्त होत आहे. राणी उंचेगावचे महसूल मंडळ अधिकारी एस.बी.कारमपुरी, तलाठी एस.एस.कुलकर्णी, जी. आर. मिसाळ या महसूलच्या या पथकाने बुधवारी ही कारवाई केली. महसूल पथकाच्या कारवाईमुळे अवैध पाणी उपशाला लगाम लागणार आहे. महसूलच्या पथकाच्या या कारवाईमुळे पाणी चोरी करणा-यात धास्ती पसरली आहे. पथकासोबत राणीउंचेगावचे सरपंच विठ्ठलराव खैरे, बालासाहेब शिंदे, तुकाराम राठोड, जगन्नाथ जाधव, सतीश माळोदे, लहू झांबरे यांची उपस्थिती होती.