बांधकाम विभागाचे दुर्लक्ष अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या जिवावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 12:35 AM2019-11-06T00:35:14+5:302019-11-06T00:35:28+5:30
शहरातील कदीम पोलीस ठाण्याच्या डागडुजीकडे होणारे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष तीन अधिका-यासह ७६ कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे!
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील कदीम पोलीस ठाण्याच्या डागडुजीकडे होणारे बांधकाम विभागाचे दुर्लक्ष तीन अधिका-यासह ७६ कर्मचाऱ्यांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे! पावसाचे पाणी मुरून ठाण्याच्या भिंती फुगल्या आहेत. यावर उपाय म्हणून पोलीस दलाच्या मार्फतच ठाण्यावर पत्र्याचे शेड आणि पीओपीचे काम हाती घेण्यात आले आहे.
शहरातील संवेदनशील भागाचा सहभाग असलेल्या कदीम पोलीस ठाण्याचा भार ३ अधिकाºयांसह ७६ कर्मचाºयांच्या खांद्यावर आहे. ठाण्याची इमारत जुनाट असून, साधारणत: सन २०१० मध्ये ठाण्याची नूतन इमारत बांधण्याबाबतचा प्रस्ताव वरिष्ठांमार्फत शासनाकडे पाठविण्यात आला आहे. जिल्ह्यात मातब्बर नेतेमंडळी असली तरी तब्बल नऊ वर्षानंतरही या ठाण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. त्यामुळे धोकादायक इमारतीतच जीव मुठीत घेऊन अधिकारी, कर्मचा-यांना दैनंदिन कामकाज करावे लागत आहे.
गत काही दिवसांपासून शहरासह परिसरात पाऊस झाला. या पावसात ठाण्यातील वायरलेस कक्षातील पीओपीचे छत अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेवेळी कोणताही अधिकारी, कर्मचारी या कक्षात नसल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेनंतर पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांनी या ठाण्याची तात्पुरती डागडुजी करावी, याबाबतच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार पोलीस दलाच्याच वतीने ठाण्याच्यावर पत्र्याचे छत मारणे आणि नवीन पीओपी करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दरम्यान, कदीम पोलीस ठाण्याची इमारत खूपच जुनी असून, भिंती ढासाळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे केवळ डागडुजी करण्याऐवजी नवीन पोलीस ठाणे बांधावे किंवा इतरत्र ठाण्याचे स्थलांतर करावे, अशी मागणी कर्मचारी करीत आहेत.
इतर इमारतीचा शोध
कदीम ठाण्याच्या नवीन इमारतीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली नाही. सध्याची इमारत खिळखिळा झाली आहे. त्यामुळे इतर शासकीय विभागाच्या वतीने बांधण्यात आलेली आणि वापराविना मोकळी असलेली इमारत कदीम ठाण्यासाठी वापरता येईल. त्यानुसार अशा इमारतीचा शोध सुरू आहे.
साधारणत: २०१७ मध्ये कदीम पोलीस ठाण्याच्या पाठीमागील बाजूस महिला कक्षाचे काम हाती घेण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालय व पोलीस प्रशासनाच्या वतीने लाखो रुपयांचा निधी या बांधकामासाठी मंजूर होता. मात्र, हे काम अर्धवट स्थितीत असून, बांधकाम विभागाच्या जबाबदार अधिका-यांचे याकडे दुर्लक्ष आहे. त्यामुळे शासनाचा लाखोचा निधी मातीत गेल्याचे दिसून येते.
महिला सुरक्षा कक्षही धोक्यात
मोडकळीस येणा-या संसारात हस्य फुलविण्याचे काम महिला सुरक्षा कक्षाकडून केले जाते. मात्र, या कक्षाचे काम ज्या इमारतीत सुरू आहे. ती इमारतही खूपच जुनी झाली आहे. त्यामुळे या महिला सुरक्षा कक्षाचे कामकाजही इतर इमारतीत सुरू करण्याची गरज आहे.