जालन्यात नदी-नाल्यांना पूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:13 PM2017-09-18T22:13:58+5:302017-09-18T22:17:48+5:30
जालना शहर व परिसरात झालेल्या पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. जाफराबाद, जालना, मंठा, भोकरदन, तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला.
जालना : जालना शहर व परिसरात झालेल्या पहाटे जोरदार पाऊस झाला. त्यामुळे शहरात सर्वत्र पाणीच पाणी झाले. जाफराबाद, जालना, मंठा, भोकरदन, तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे अनेक ठिकाणी नदी-नाल्यांना पूर आला.
रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. सुमारे दीडतास मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर पहाटे सहा वाजेपर्यंत पावसाची संततधार सुरूच होती. या पावसामुळे शहरातील सखल भाग जलमय झाला. टाऊन हॉल परिसरात नाल्याचे पाणी रस्त्यावर आल्याने सर्वत्र पाणीच पाणी झाले. शनिमंदिर ते सरस्वती भुवन शाळेपर्यंत खोदलेल्या रस्ता पावसाच्या पाण्याने तुडुंब भरला. अंतर्गत भागातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिकांची गैरसोय झाली.
दरम्यान, या आठवड्यात झालेल्या दमदार पावसामुळे कुंडिलाका नदीवरील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती बंधाºयावरून पाणी वाहत आहे. सीना नदही खळखळून वाहत आहे. जालना तालुक्यातही बहुतांश ठिकाणी मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला. दरम्यान, सोमवारी सकाळी प्र्राप्त आकडेवारीनुसार जालना तालुक्यात २९. ३८, बदनापूरमध्ये १६. ४०, भोकरदनमध्ये २३.३८, जाफराबादमध्ये ३६.४० परतूरमध्ये १२.६०, मंठ्यात ४९.५०, अंबडमध्ये १.४३, घनसावंगी २.१४ तर परतुरात १२.६० मिलिमीटर पाऊस झाला. अंबड, घनसावंगी , बदनापूर व परतूर तालुक्यात पावसाचा जोर कमी राहिला. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण सरासरीच्या ५५३.०० मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे.
पारधम्ये पोलीस वसाहत जलमय
पारध येथे झालेल्या जोरदार पावसाने येथील पोलीस वसाहत जलयम झाली. अनेक घरांमधे पाणी देखील शिरले. पोलीस कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबीयांची मोठी धांदल उडाली.