रस्ता, पाण्यासाठी मतदानावर बहिष्कार..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 01:00 AM2019-10-15T01:00:05+5:302019-10-15T01:00:22+5:30
वारंवार मागणी करूनही मूलभूत प्रश्न सुटत नसल्याने जालना तालुक्यातील तालुक्यातील मौजपुरी येथील व बदनापूर तालुक्यातील देऊळगाव येथील मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना / मौजपुरी : वारंवार मागणी करूनही मूलभूत प्रश्न सुटत नसल्याने जालना तालुक्यातील तालुक्यातील मौजपुरी येथील व बदनापूर तालुक्यातील देऊळगाव येथील मतदारांनी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. लोकशाहीच्या उत्सवातच मतदारांनी बहिष्काराचे हत्यार उपसल्याने प्रशासनाकडून कोणती भूमिका घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.
जालना तालुक्यातील मौजपुरी येथील करुणा मोरे यांनी महिलांच्या वतीने प्रसिध्दीपत्रक काढले आहे. गावात लाखो रूपये खर्च करून विकास कामे झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आजही ग्रामस्थांना मूलभूत सोयी-सुविधांच्या प्रश्नाचा सामना करावा लागतो. गावातील धार्मिक स्थळावर डोकं टेकविण्यासाठी हजारो भाविक येतात. मात्र, त्यांच्यासाठी स्वच्छतागृहाची सोय उपलब्ध करून दिलेली नाही. त्यामुळे महिलांची गैरसोय होत आहे.
गावातील मूलभूत प्रश्न सोडविणे, जिल्हा परिषद शाळेत सेमी इंग्रजीचे वर्ग सुरू करणे इ. विविध प्रश्न मांडले असून, हे प्रश्न वर्षानुवर्षापासून कायम आहेत. हे प्रश्न कोणत्याच राजकीय नेत्याने सोडविलेले नाहीत. त्यामुळे आम्ही मतदान प्रक्रियेवर बहिष्कार टाकत असल्याचेही मोरे यांनी पत्रकात नमूद केले आहे.
बदनापूर तालुक्यातील देऊळगाव येथील ग्रामस्थांनी निवडणुकीवर बहिष्कार टाकणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात दिला आहे. जालना- राजूर मार्गाचे काम झाले. मात्र, नाल्यांचे काम न झाल्याने सांडपाणी रस्त्यावर येत आहे. त्यामुळे अपघात होण्याचे प्रकार घडत असून, शाळकरी मुलांनाही याचा त्रास सहन करावा लागत आहे.
मागासवर्गीय वस्तीत थंडी, ताप, मलेरिया, खोकला, डेंग्यू इ. आजार उद्भवले आहेत. या भागात गत दोन वर्षापासून नाल्यांच्या साफसफाईची कामे झालेली नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर रतनराज डोळसे, पूनम डोळसे, रोहिणी लोखंडे, गजानन अंकुशकर, यम्मन कातुरे, यशोदा माने, सुनील डोळसे, मिलिंद दाभाडे, संजय डोळसे, छगनराव वाघमारे, सिध्दार्थ पवार, रोहन डोळसे, सिध्दार्थ डोळसे यांच्यासह गावातील जवळपास ६२ ग्रामस्थांच्या स्वाक्षºया आहेत. दरम्यान, ऐन निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन गावातील नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे प्रशासन आणि सर्वपक्षीय राजकीय नेतेमंडळी कोणती भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे.
टंचाई : विहिरीतून आणावे लागते पाणी
मान देऊळगाव येथे बारमाही पाणीटंचाई आहे. महिलांना विहिरीतून शेंदून पाणी आणावे लागते. यापूर्वी एका महिलेचा पाणी आणताना जीव गेला आहे. बाणेपांगरी आरोग्य उपकेंद्रात महिलांची गैरसोय होत आहे, यासह इतर अनेक समस्या ग्रामस्थांनी प्रशासनासमोर मांडण्यात आल्या आहेत.
आंदोलनाचा इशारा
देऊळगाव येथील ग्रामस्थांनी मुलभूत सोयी-सुविधांचा प्रश्न सोडविण्यासाठी निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. शिवाय १८ आॅक्टोबर रोजी रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे.