रस्त्यावर मृत्यूची सवारी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2019 12:20 AM2019-07-15T00:20:20+5:302019-07-15T00:20:47+5:30

वाहतूक नियम धाब्यावर बसविणाऱ्या चालकांमुळे रस्ता अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे.

Road to death! | रस्त्यावर मृत्यूची सवारी!

रस्त्यावर मृत्यूची सवारी!

Next

विजय मुंडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वाहतूक नियम धाब्यावर बसविणाऱ्या चालकांमुळे रस्ता अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मागील सहा महिन्यांत जिल्ह्यातील महामार्गांसह ग्रामीण रस्त्यावर तब्बल २२७ अपघात झाले आहेत. यातील ९९ अपघातांमध्ये १०७ जणांचा बळी गेला आहे, तर १८५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
स्पर्धेच्या युगातील बदलत्या जीवनैशलीमुळे घरोघरी दुचाकी, चारचाकी वाहने आली. वाहनांची संख्या वाढली असली तरी वाहतूक नियमांचे पालन करणारे चालक अभावानेच दिसून येतात. चालकांकडून वाहतूक नियम धाब्यावर बसविले जात असल्याने रस्ता अपघातात दिवसेंदिवस वाढ होत आहे. गतवर्षी जून महिन्यापर्यंत जालना जिल्ह्यात २०२ रस्ता अपघात झाले होते. यातील ९९ अपघातात ११० जणांचा बळी गेला होता. ७० अपघातात १३७ जण गंभीर जखमी झाले होते. १४ अपघातात २३ जण किरकोळ जखमी झाले होते. तर १९ अपघातांमध्ये कोणी जखमी झाले नव्हते. मात्र, चालू वर्षातील सहा महिन्यातच २२७ रस्ता अपघात जिल्ह्यात झाले आहेत. यातील ९९ अपघातांमध्ये १०७ जणांचा बळी गेला आहे. ८० अपघातात १८५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. तर २७ अपघातांमध्ये ४१ प्रवासी किरकोळ जखमी झाल्याची नोंद आहे. तर २१ अपघातात कोणीही जखमी झालेले नाही. गतवर्षीच्या तुलनेत यंदा रस्ता अपघातात वाढ झाली आहे. रस्ता अपघात होऊ नयेत यासाठी ‘रस्ता सुरक्षा सप्ताह’ राबवून वाहतूक नियमांची जनजागृती केली जाते. उपप्रादेशिक परिवहन विभाग, वाहतूक शाखेकडूनही कारवाईचे सत्र राबविले जाते. शिवाय महामार्ग, राज्यमार्गासह इतर मार्गावरही चालकांना जबाबदारीची जाणीव करून देणाºया सूचना असतात. मात्र, वाहन चालक याकडे दुर्लक्ष करीत असल्याने रस्त्यावर प्रवाशांच्या मृत्यूची सवारी सुरू असल्याचे दुर्दैवी चित्र आहे.
अपघाताची कारणे : मद्यप्राषण करून वाहन चालविणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, वेग मर्यादेचे पालन न करणे, वाहनातील तांत्रिक बिघाडाकडे दुर्लक्ष करणे यासह इतर विविध कारणांमुळे अपघाताला निमंत्रण मिळत आहे.
अशी घ्या दक्षता : मद्यप्राषण करून वाहन चालवू नका, वेग मर्यादेचे पालन करा, रस्त्यावरील सूचनांकडे लक्ष द्या, वाहनांची वेळोवेळी दुरूस्ती करून घेण्यासह चालकांनी वाहतूक नियमांचे पालन केले तर रस्ता अपघात टाळता येणे शक्य होईल.
खड्डे, साईडपट्ट्याही कारणीभूत : राष्ट्रीय, राज्य महामार्गासह ग्रामीण भागातील रस्त्यांच्या खचलेल्या साईडपट्ट्या आणि खड्डेही अपघाताला निमंत्रण देत आहेत. अशा खड्ड्यांना चुकविण्याच्या प्रयत्नातही अनेक अपघात झालेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने साईडपट्ट्यांच्या दुरूस्तीसह रस्त्यावरील खड्डे वेळीच बुजविणे गरजेचे आहे.
रिफ्लेक्टर नसलेली धोकादायक वाहने : रिफ्लेक्टर नसलेली वाहने रात्रीच्या वेळी बंद पडली की रस्त्यावरच उभी केली जातात. परिणामी चालकांना रस्त्यावरील या वाहनांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. काही दिवसांपूर्वीच मंठा तालुक्यातील तळणी मार्गावरील ठेंगेवडगाव पाटीवरील रस्त्यावर थांबलेल्या टिप्परला धडकल्याने दुचाकीस्वार एका मायलेकासह एका मेकॅनिकचा मृत्यू झाला होता.

Web Title: Road to death!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.