जालना जिल्हा कारागृहाचा मार्ग खडतर, पोलीस कर्मचाऱ्यांची गैरसोय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2019 01:20 AM2019-02-19T01:20:05+5:302019-02-19T01:21:06+5:30
राज्य शासनाने तब्बल २१ कोटी ४२ लाख रुपये खर्च करुन इंदेवाडी परिसरात सुसज्य जिल्हा कारागृहाची उभारणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : राज्य शासनाने तब्बल २१ कोटी ४२ लाख रुपये खर्च करुन इंदेवाडी परिसरात सुसज्य जिल्हा कारागृहाची उभारणी केली आहे. मात्र कारागृहाकडे जाण्यासाठी पक्का रस्ताच नसल्याने पोलीस कर्मचा-यांची गैरसोय होत आहे. गेल्या सहा वर्षापासून शासनाकडे रस्त्यासाठी पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र याकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत आहे.
अंबड मार्गावर असलेल्या इंदेवाडी परिसरातील ७५ एकर जागेवर जिल्हा कारागृहाची उभारणी करण्यात आली आहे. १ डिसेंबर २९१४ रोजी तत्कालीन जिल्हाधिकारी ए. एस.आर नायक यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले होते. सध्या स्थितीत कारागृहात ६०० कैदी ठेवण्याची क्षमता आहे. कारागृहात प्रशासकीय इमारत, जनरल बरॅक, कीचन बरॅक, दवाखाना, कार्यशाळा इमारत, तब्बल ७५ पोलीस कर्मचा-यांचे निवासस्थाने , अतिसुरक्षा भिंत प्रतीक्षा कक्ष बाहेरील आवार आदी उभारण्यात आले आहेत. मात्र कारागृहाकडे जाणारा मार्ग अद्यापही पक्का झाला नसल्याने पोलिसांना कारागृहापर्यंत कैद्यांना नेताना मोठा अडचणीचा सामना करावा लागत आहे.
पावसाच्या दिवसात तर दोन किमी चिखल तुडवत धोकादायक रीत्या कैद्यांना न्यावे लागते. यात कैदी पळून जाण्याची भीती असल्याचे अनेकदा पोलिसांनी तक्रारी केल्या आहेत. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे. सलग सहा वर्षापासून जिल्हा नियोजन समितीसमोर कारागृहाच्या रस्त्याचा विषय मांडण्यात येत आहे. मात्र याला अद्यापही मंजुरी मिळालेली नाही. येथील पोलीस कर्मचाºयांच्या कुटुंबीय, कैद्याना भेटण्यास येणाºया नातेवाईकांना सुध्दा रस्त्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले.
राज्यातील जुन्या कारागृहाची डागडुजी, संरक्षण भिंत, बराकीची सुरक्षिता इ. देखभाल दुरुस्तीसाठी राज्य शासनाने सोमवारी ९ कोटी ४२ लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याचे जाहीर केले. असे असताना जालना येथील जिल्हा कारागृहाचा रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर होण्यास अडचणी येत आहे. पालकमंत्री बबनराव लोणीकर यांनी लक्ष देण्याची गरज आहे.